

कोल्हापूर : राज्य शासनाच्या नशामुक्त अभियानाच्या पार्श्वभूमीवर ‘नशामुक्त कोल्हापूर अभियाना’चा शनिवारी पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते शुभारंभ झाला. जिल्हाधिकारी कार्यालयात पोस्टर प्रकाशनाने अभियानास सुरुवात झाली.
यावेळी जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी नशामुक्त कोल्हापूर अभियानासंदर्भात स्लाईड शोद्वारे सादरीकरण करून अभियानाची सविस्तर माहिती दिली. डॉ. राठोड यांनी प्रशासन समन्वय, कठोर कारवाई, जनजागृती आणि शिक्षण या त्रिसूत्रीनुसार हे अभियान राबविण्याचा संकल्प व्यक्त केला. औपचारिकता नव्हे तर सामाजिक जबाबदारी म्हणून प्रशासनातील प्रत्येक घटकाचे काम असेल. त्यासाठी सर्व विभाग हातात हात घालून अभियान यशस्वी करतील, असा विश्वास व्यक्त केला. शिक्षण, पोलिस, राज्य उत्पादन शुल्क अशा विविध विभागांमार्फत हे अभियान यशस्वी करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त केला. रन फाॅर नशामुक्त कोल्हापूर, वॉक फॉर नशामुक्त कोल्हापूर अशा विविध उपक्रमांतून या अभियानाबाबत जनजागृती करण्याचे नियोजन करण्यात आल्याचे जिल्हाधिकारी डॉ. राठोड यांनी सांगितले. यावेळी विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
अमली पदार्थ तस्करी, पुरवठा साखळी मोडून काढा
कोल्हापूर : गांजा व तत्सम मादक पदार्थांची तस्करी व पुरवठा साखळी पूर्णपणे मोडून काढण्यासाठी ‘शून्य सहनशीलता’ (झीरो टॉलरन्स) धोरण राबवा, असे आदेश पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात शनिवारी झालेल्या विशेष बैठकीत त्यांच्या हस्ते अभियानाचा प्रारंभ झाला, यावेळी ते बोलत होते.
आबिटकर म्हणाले, माध्यमिक, उच्च माध्यमिक स्तरावरील विद्यार्थी तंबाखू, सिगारेट, गांजा अशा मादक पदार्थांच्या विळख्यात अडकत चालले असून, याचे विनाशकारी परिणाम केवळ एका व्यक्तीपुरते मर्यादित न राहता संपूर्ण समाजाला पोखरत आहेत. त्यामुळे प्रशासनाने कठोर पावले उचलावीत. कोल्हापूर जिल्ह्याने उत्कृष्ट कार्य करीत अभियान राज्यस्तरावर राबविले जाईल. सदृढ समाज निर्मितीसाठी ‘नशामुक्त कोल्हापूर अभियान’ युद्धपातळीवर राबविण्यात येत आहे. १५ जून रोजी शाळा प्रवेशोत्सवावेळी विद्यार्थ्यांना सामूहिक नशामुक्तीची शपथ दिली जाईल. विद्यार्थ्यांमध्ये नैतिक मूल्ये रुजविण्यासाठी शाळा, महाविद्यालयांमध्ये ‘संस्कार भारती’ वर्ग घेतले जातील. सर्व शासकीय विभागांनी एकत्रितपणे कार्य करून अभियान यशस्वी करावे आणि कोल्हापूरला पूर्णपणे नशामुक्त करावे, असे आवाहनही त्यांनी केले.
यावेळी जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड, पोलिस अधीक्षक निलोत्पल, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. जॅसमिन, आमदार अशोकराव माने, इचलकरंजीचे महापौर उदय धातुंडे, जिल्हा नियोजन अधिकारी विक्रम देशमुख, कोल्हापूर महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ आदींसह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. इतर लोकप्रतिनिधी, तालुका अधिकारी ऑनलाईन पद्धतीने सहभागी झाले होते. जिल्हाधिकारी डॉ. राठोड यांनी पोस्टर अनावरणद्वारे अभियानाची घोषणा केली. बैठकीत महापौर रूपाराणी निकम, उदय धातुंडे, नगराध्यक्ष विद्याताई पोळ यांनी या अभियानात सक्रिय सहभागी होण्याची गरज असल्याचे सांगितले. पोलिस अधीक्षक निलोत्पल यांनी हे अभियान यशस्वी करण्यासाठी कठोर कारवाईची ग्वाही दिली. निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव यांनी आभार मानले.
प्रोत्साहनात्मक बक्षीस देणार
स्थानिक आमदार, खासदार व नगरसेवकांच्या नेतृत्वाखाली ग्रामसभांमध्ये ठराव करून ‘नशामुक्त वॉर्ड’ तसेच ‘नशामुक्त ग्रामपंचायत’ संकल्पना यशस्वी करणाऱ्यांना शासनातर्फे प्रोत्साहनात्मक बक्षिसांची घोषणाही आबिटकर यांनी केली.