कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : शिवाजी विद्यापीठाच्या विद्यार्थी वसतिगृह क्र. 3 च्या मेसच्या जेवणात डाळीच्या आमटीत शनिवारी रात्री पुन्हा अळ्या सापडल्या. यामुळे विद्यापीठ प्रशासनाचा गलथान कारभार उघड झाला आहे. वारंवार घडणार्या प्रकाराचा विद्यार्थ्यांमधून संताप व्यक्त केला जात आहे. अळी निघाल्यावर अनेकजण उपाशी झोपल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले.
यापूर्वी गेल्याच आठवड्यात वसतिगृह क्र. 1 मधील मेसच्या जेवणात अळ्या आढळून आल्या होत्या. यानंतर विद्यापीठ प्रशासनाने तत्काळ दखल घेत समिती नेमली आहे. दरम्यान, शनिवारी वसतिगृह क्र. 3 मधील मेसमध्ये रात्री भात व डाळीच्या आमटीत अळ्या आढळून आल्या. याची तक्रार काही विद्यार्थ्यांनी रेक्टर यांच्याकडे केली. याची माहिती समजताच अभाविपचे पदाधिकारी मेसमध्ये गेले. वसतिगृहाचे चीफ रेक्टर डॉ. प्रल्हाद माने यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती करीत जाब विचारला.
विद्यापीठांच्या मुलांच्या वसतिगृह क्रमांक 1 मधील मेसच्या जेवणामध्ये अळ्या आढळून आल्याचा प्रकार सोमवारी (दि. 23) उघडकीस आला होता. त्यानंतर जागे झालेल्या प्रशासनाने चौकशी समिती नेमली. समितीकडून घडलेल्या प्रकाराची चौकशी सुरू असतानाच पुन्हा शनिवारी अळ्या आढळून आल्या आहेत. त्यामुळे समिती नावालाच आहे की काय? असा आरोप विद्यार्थी करीत आहेत.