

कोल्हापूर : महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा रविवारी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या जनसंवाद कार्यक्रमात निवेदनांचा अक्षरशः पाऊस पडला. तब्बल हजारांवर नागरिकांनी आपल्या मागण्यांची निवेदने त्यांना सादर केली. यामुळे या जनसंवादाला प्रचंड गर्दी झाली होती. आपल्या प्रश्नांची दखल घेतली आहे, त्याची सोडवणूक करू, अशी ग्वाही त्यांनी दिली.
प्रलंबित मागण्या, व्यथा मांडण्यासाठी आलेल्या नागरिकांची मोठी गर्दी झाली. मंत्री बावनकुळे यांना निवेदन देण्यासाठी पुढे जाणाऱ्यावरून वारंवार नागरिकांत ढकलाढकली होत होती. मात्र जोपर्यंत शेवटच्या नागरिकाचे निवेदन स्वीकारत नाही तोपर्यंत हे व्यासपीठ सोडणार नाही, अशा शब्दांत मंत्री बावनकुळे नागरिकांना दिलासा देत होते. अखेरच्या वक्तीचे निवेदन स्वीकारेपर्यंत ते व्यासपीठावर थांबून होते. यावेळी प्रत्येकाचा प्रश्न त्यांनी समजून घेतला, त्याची सोडवणूक करण्याबाबत आश्वस्त केले. यामुळे नागरिकांच्या चेहऱ्यावर समाधान जाणवत होते.
निवेदने स्वीकारण्यासाठी दुपारी तीन ते पाच अशी वेळ देण्यात आली होती. याकरिता अनेक नागरिकांनी दुपारी 12 वाजल्यापासूनच जिल्हाधिकारी कार्यालयात गर्दी केली होती. मंत्री बावनकुळे यांचे दुपारी साडेचारच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालयात आगमन झाले. नागरिकांना निवेदनासाठी टोकन नंबर दिला जात होता. निवेदन स्वीकारल्यानंतर त्याची पोच देण्याची स्वतंत्र व्यवस्था केली होती. मात्र काही वेळातच निवेदन देण्यासाठी इतकी गर्दी झाली की पोच देणे बंद करावे लागले. सुमारे दोन तासांत ७५४ वर टोकन झाली, त्याखेरीज विना टोकनही निवेदने देण्यात आली. सुमारे १ हजार ३४ च्यावर निवदने प्राप्त झाली.
यावेळी महापौर रूपाराणी निकम, आमदार अमल महाडिक, आमदार राहुल आवाडे, आमदार शिवाजी पाटील, आमदार अशोकराव माने, जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड, अपर जिल्हाधिकारी अजय पवार, निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव, करवीरच्या प्रांताधिकारी मौसमी चौगुले, भाजप प्रदेश सचिव महेश जाधव, महानगर जिल्हाध्यक्ष विजय जाधव, ग्रामीण जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील आदी उपस्थित होते.
साहेब.... एकच नंबर...!
मंत्री बावनकुळे हे जिल्हाधिकारी कार्यालयात आले. त्यावेळी नागरिकांची तोबा गर्दी झाली होती. या सर्व गर्दीला दिलासा देण्याचे काम मंत्री बावनकुळे यांनी केले. जोपर्यंत शेवटच्या नागरिकाचे निवेदन स्वीकारत नाही तोपर्यंत हे व्यासपीठ सोडणार नाही, अशा शब्दांत मंत्री बावनकुळे यांचा नागरिकांना दिलासा दिला. त्यावेळी या दिलाशाबद्दल उपस्थितातून साहेब.... एकच नंबर...! अशा प्रतिक्रिया आल्या.