

कोल्हापूर : येथील राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालयातर्फे आयोजित करण्यात आलेल्या डॉ. मुफज्जल लकडावाला यांच्या मोफत लॅप्रोस्कॉपी शस्त्रक्रिया शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
या शिबिरात तब्बल 55 शस्त्रक्रिया करण्यात आल्या. यामध्ये 50 शस्त्रकिया लॅप्रोस्कॉपीद्वारे झाल्या, तर 5 शस्त्रक्रिया टाक्यांच्या झाल्या आहेत. डॉ. मुफज्जल लकडावाला यांच्यासह 22 डॉक्टरांनी शनिवार आणि रविवारी ही वैद्यकीय सेवा दिली. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर झाले. शिबिरात लॅप्रोस्कॉपी दुर्बीणद्वारे बिन टाक्याच्या हर्निया 32, गर्भाशय पिशवी काढणे 10, अपेंडिक्स 5, पित्ताशय पिशवी काढणे 3 या शस्त्रक्रिया करण्यात आल्या. तर गुडघा प्रत्यारोपण 3 व व्हेरिकोज व्हेन 2 अशा एकूण 55 शस्त्रकिया डॉ. लकडावाला यांनी केल्या आहेत. त्यामुळे मोफत शस्त्रक्रिया आणि उपचार यामुळे रुग्णांसह नातेवाईकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
या शिबिरासाठी मिरेल कंपनीने वैद्यकीय साहित्य पुरवठा केला आहे. त्यामुळे पाच ते सहा लाखांपर्यंत खर्च येणार्या शस्त्रक्रिया समाजसेवेच्या भावनेतून डॉ. लकडावाला येथे मोफत केल्या. यासाठी त्यांना सोबत असणार्या 22 डॉक्टरांची मोलाची साथ दिली. सीपीआरचे अधिष्ठाता डॉ. एस. एस. मोरे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. शिशिर मिरगुंडे, सर्जरी विभाग प्रमुख वसंतराव देशमुख, डॉ. भास्कर मूर्ती, डॉ. राहुल बडे, डॉ. श्वेनिल शहा यांच्यासह डॉक्टर, नर्सेस अन्य स्टाफने परिश्रम घेतले.