.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
कळे : पुढारी वृत्तसेवा : धामणी खोऱ्यातील अंबर्डे (ता. पन्हाळा) येथे रविवारी (दि. २१) मध्यरात्री दोनच्या सुमारास भूस्खलन होऊन दोन घरांचे नुकसान झाले. दोन कुटुंबातील १६ जणांचे स्थलांतर केले असून आणखी तीन घरे धोकादायक स्थितीत आहेत.
दिवसभर झालेल्या मुसळधार पावसामुळे अंबर्डे येथील आंबेडकरनगरमधील सहदेव पांडुरंग कांबळे व शहाजी राऊ कांबळे यांच्या घरासमोरील खालील बाजू भूस्खलनामुळे अचानक तुटून गेली. घराच्या भिंतींना तडे जाऊन प्रापंचिक साहित्याचे नुकसान झाले. पावसाचा जोर वाढल्यास येथे मोठ्या प्रमाणात भूस्खलन होण्याचा धोका निर्माण झाला आहे. याठिकाणी असणाऱ्या दोन कुटुंबातील महिला व लहान मुलांसह एकूण १६ जणांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात आले. या परिसरातील आणखी तीन घरांना भूस्खलनाचा धोका असल्याने येथे राहणाऱ्या तीन कुटुंबांना पोलीस पाटील रामदास पाटील यांनी स्थलांतराबाबत लेखी नोटीस दिली आहे.
भूस्खलन झालेल्या ठिकाणी सोमवारी (ता.२२) पन्हाळ्याच्या गटविकास अधिकारी सोनाली माडकर यांच्यासह ग्रामपंचायत प्रशासनाने भेट देवून घटनास्थळाची पाहणी केली. या परिसरातील धोकादायक घरांची महसूल प्रशासनाने पाहणी करून झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.