कोल्हापूर : इंगळी येथील सहामोट विहिरीचे पुन्हा भूस्खलन
हुपरी : इंगळी (ता. हातकणंगले) येथील हुपरी रस्त्यावरील मशिदीसमोरील सहामोट म्हणून ओळख असणार्या विहिरीची संरक्षक भिंतीचे मंगळवारी रात्री पुन्हा एकदा भूस्खलन झाले. उत्तर बाजूकडील रहदारीचा रस्ता व सुमारे 50 फूट उरलीसुरली संरक्षक भिंतही विहिरीत ढासळली. परिणामी विहीर परिसरातील संपूर्ण घरांना व मशिदीला धोका निर्माण झाला आहे.
इंगळी-हुपरी रस्त्यांलगत पूर्वीपासून सहामोट विहीर म्हणून ओळख असलेली भातमारे-खोत यांची भली मोठी जुनी विहीर आहे. सुमारे 42 वर्षांपूर्वी या विहिरीचा काही भाग विहिरीत कोसळला गेला होता. रस्ता रुंदीकरणावेळी कोसळलेल्या भरावावरच बांधकाम करून भर टाकून रस्त्याचे रुंदीकरण करण्यात आले होते. 25 मार्चला या विहिरीचे भूस्खलन होऊन संरक्षक भिंतीसह संपूर्ण रस्ता व या भिंतीशेजारी असणार्या आठ टपर्या तसेच ग्रामपंचायतीचा पाण्याचा हौद विहिरीत कोसळून मलब्याखाली गाडला गेल्याने मोठे नुकसान झाले होते. सुदैवाने दुपारच्यावेळी ही घटना घडल्याने टपर्या बंद होत्या. त्यामुळे मोठा अनर्थ टळला होता.
ज्यावेळी पहिल्यांदा भूस्खलन होऊन संपूर्ण भिंत व शेजारच्या टपर्या गाडल्या गेल्या त्यावेळीही मंगळवारच (दि. 25 मार्च) होता व आजही मंगळवारच होता हा एक योगायोग म्हणायचा की आणखी काय? अशी चर्चा घटनास्थळी सुरू होती. सहमोट विहिरीत ढासळलेला हा रस्ता गावातून हुपरीकडे जाण्याचा एकमेव मुख्य रस्ता आहे. हा रस्ता 25 मार्चला झालेल्या भूस्खलनावेळी विहिरीत पूर्णपणे ढासळला आहे. तेव्हापासून या रस्त्यांवरील नागरिकांचा प्रवास जीवावर उदार होऊनच सुरू आहे. या विहिरीचे बांधकाम लवकरात लवकर सुरू करून वाहतुकीसाठी हा रस्ता पूर्ववत खुला करण्यात यावा, अशी मागणी सरपंच दादासाहेब मोरे यांनी 20 मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे केली होती. तोपर्यंत मंगळवारी पुन्हा भूस्खलन होऊन संपूर्ण परिसराला धोका निर्माण झाला आहे.
प्रांताधिकारी, अपर तहसीलदारांनी दिली भेट
दरम्यान, घटनेनंतर मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळत असतानाही प्रांताधिकारी मौसमी चौगुले, अप्पर तहसीलदार सुनील शेरखाने, सार्वजनिक बांधकाम व जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाचे वरिष्ठ अभियंता आदींनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. यावेळी सरपंच दादासाहेब मोरे यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

