

जयसिंगपूर : रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्ग क्र. 166 च्या चोकाक (ता. हातकणंगले) ते उदगाव (ता. शिरोळ) व अंकली (ता. मिरज) हा शेवटचा टप्पा हस्तांतरणाचा शिल्लक राहिला आहे. शिरोळ आणि हातकणंगले तालुक्यांतील शेतकर्यांनी चौपट मागणीचा मुद्दा घेऊन सर्व काम बंद पाडले होते. अशातच बुधवारी राष्ट्रीय प्राधिकरणाने अंकली (ता. मिरज) येथील 92 शेतकर्यांची 21 गटातील 3.664 हेक्टर जमीन हस्तांतर करणार असल्याचे राजपत्र प्रसिद्ध केले आहे.
रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्ग क्र. 166 चे काम अंकली (ता. मिरज) इथंपर्यंत पूर्ण झाले आहे. त्याचबरोबर उदगाव ते चोकाक, चोकाक ते पैजारवाडी, पैजारवाडी ते आंबा, आंंबा ते रत्नागिरी असे या कामाचे स्वरूप आहे. यातील रत्नागिरी ते चोकाकपर्यंतचे काम पूर्ण करण्यात येत आहे. सध्या चोकाक ते उदगाव, अंकलीपर्यंतचा जमीन हस्तांतरणाचा मुद्दा गेल्या वर्षभरापासून वादाच्या भोवर्यात सापडला होता. शिरोळ व हातकणंगले तालुक्यातील बाधित गावांतील शेतकर्यांनी चौपट मागणी आणि बायपास महामार्ग न्यावा, यासाठी राष्ट्रीय महामार्गाचे काम सातत्याने बंद पाडले आहे. त्यामुळे शिरोळ, हातकणंगले तालुक्यांतील काम ठप्प आहे.
असे असताना अंकली (ता. मिरज) येथे सांगली-कोल्हापूर महामार्गापर्यंत रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गाचे काम पूर्ण झाले असून, आता सांगली-कोल्हापूर महामार्गाला छेद करून कृष्णा नदीच्या उदगाव गावच्या हद्दीपर्यंतचे जमीन निश्चितीकरण राष्ट्रीय प्राधिकरण विभागाने पूर्ण केले आहे. याचे राजपत्र बुधवारी प्रसिद्ध झाल्याने एका अंकली गावाचीच जमीन निश्चित करण्यात प्रशासनाला यश मिळाले आहे. त्यामुळे आता शिरोळ, हातकणंगले तालुक्यांतील जमिनी हस्तांतरणाचा प्रश्न समोर येणार आहे.