शाहू मिलच्या जागेवर लँड माफियांचा डोळा

सर्वपक्षीय शाहू मिल पुनर्जीवन समितीचा आरोप; व्यावसायिक वापरासाठी एक इंचही जागा देणार नाही
कोल्हापूर : शाहू मिलसंदर्भात खासदार शाहू महाराज यांच्या सोबतच्या बैठकीत बोलताना अ‍ॅड. बाबा इंदूलकर, बाबा पार्टे, विजय देवणे आदी.
कोल्हापूर : शाहू मिलसंदर्भात खासदार शाहू महाराज यांच्या सोबतच्या बैठकीत बोलताना अ‍ॅड. बाबा इंदूलकर, बाबा पार्टे, विजय देवणे आदी. (छाया : पप्पू अत्तार)
Published on
Updated on

कोल्हापूर : कोल्हापुरात बहुतांश हेरिटेज जमिनी हडप करण्याचा डाव आहे. काहींना शाहू मिल येथे स्मारकासह मिल उभारू द्यायची नाही. या जागेवरही लँड माफियांचा डोळा असल्याचा आरोप प्रजासत्ताक सेवा संस्थेचे दिलीप देसाई यांनी केला.

सर्वपक्षीय शाहू मिल पुनर्जीवन समितीने शाहू मिल पुन्हा सुरू होण्यासाठी रविवारी खासदार शाहू महाराज यांची भेट घेतली. यावेळी ते बोलत होते. या आंदोलनाला का महत्त्व आहे? त्यासाठी खा. शाहू महाराज यांनी का पुढाकार घ्यावा, हे त्यांना पटवून दिले. संभाजी जगदाळे यांनी 10 एकर नव्हे, तर संपूर्ण 27 एकर जागा मिलसाठीच घ्यावी, अशी सूचना केली. माजी नगरसेवक बाबा पार्टे यांनी टोलप्रमाणे शाहू मिलसाठी आंदोलन करू, असे सांगितले. शासनाला शाहू मिल पुन्हा उभा करायची नसेल, तर ही जागा पुन्हा खासदार शाहू महाराज यांना द्यावी, अशीही भूमिका अ‍ॅड. इंदूलकर यांनी मांडली. यावर खासदार शाहू महाराज यांनी या जागेचे अगोदरच राष्ट्रीयीकरण झाले आहे. त्यामुळे ती परत मिळू शकत नसल्याचे स्पष्ट केले.

अशोक भंडारे म्हणाले, शाहू मिल ही बहुजनांची मिल आहे. या ठिकाणी स्मारक करण्याचा प्रस्ताव पाठविला आहे. कोल्हापुरातील मंत्री यासंदर्भात काही करतील, असे वाटत नाही. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना भेटून यावर मार्ग काढावा. कॉ. दिलीप पवार, अनिल कदम यांनी मनोगत व्यक्त केले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आज बैठक

शाहू मिल पुनर्जीवित करण्यासंदर्भात सोमवारी (दि. 2) जिल्हाधिकारी कार्यालयात सकाळी 11.45 वाजता बैठक होणार आहे. खासदार शाहू महाराज यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होईल.

प्रेतावर पाय देऊनच जावे लागेल

शासनाला शाहू मिलची एक इंचही जागा व्यावसायिक वापरासाठी देणार नाही, असा ठाम निर्धार कृती समितीचा असल्याचेही अ‍ॅड. इंदूलकर यांनी सांगितले. समितीच्या सदस्यांच्या प्रेतावर पाय देऊनच व्यावसायिक वापर करावा लागेल, असा इशाराही त्यांनी दिला.

शाहू मिल करणे हेच ‘शाहू स्मारक’

शिवसेनेचे विजय देवणे म्हणाले, कापड व्यवसायातील नामवंत कंपन्या कोल्हापुरात आहेत. त्यामुळे शाहू मिल पुन्हा सुरू होणे शक्य आहे. यासाठी शासनस्तरवर पत्र देऊन पालकमंत्री, महापौर, कृती समिती, संबंधित अधिकारी यांची तत्काळ बैठक आयोजित करावी. तुम्ही छत्रपती, शाहूंचे वारस आणि कोल्हापूरचे खासदार असल्याने शाहू मिलसाठी पुढाकार घ्यावा. या ठिकाणी शाहू मिल करणे हेच शाहू स्मारक ठरणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news