कोल्हापूर : नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी करवीरनिवासिनी श्री अंबाबाईच्या दर्शनासाठी पर्यटकांसह स्थानिक भाविकांनी गुरुवारी पहाटेपासूनच अलोट गर्दी केली. दिवसभरात एक लाखावर भाविकांनी अंबाबाईचे दर्शन घेऊन नववर्षारंभ केला. अंबाबाई दर्शनानंतर रंकाळा तलाव, न्यू पॅलेस, शाहू समाधी स्थळ, शाहू जन्मस्थळ, टाऊन हॉल वस्तूसंग्रहालय तसेच जोतिबा-पन्हाळा, कणेरीमठ, नृसिंहवाडी येथेही पर्यटकांची गर्दी झाली. दरम्यान, गेल्या आठ दिवसांत सुमारे आठ लाख पर्यटकांनी कोल्हापूरला भेट दिली.
नाताळच्या सुट्ट्या आणि नवीन वर्षाची सुरुवात यानिमित्ताने कोल्हापुरात पर्यटकांची मांदियाळी झाली. गेल्या आठ दिवसांपासून शहरासह जिल्ह्यातील पर्यटनस्थळे फुलून गेली आहेत. साडेतीन शक्तिपीठांपैकी एक पीठ असलेल्या अंबाबाई मंदिरात देवीचे दर्शन घेऊन नव्या वर्षाची सुरुवात करण्याचा संकल्प अनेक पर्यटकांकडून दरवर्षी केला जातो. यंदाही असा संकल्प करून कोल्हापूरला पर्यटकांनी मोठ्या संख्येने भेट दिली. गुरुवार वर्षाच्या पहिल्याच दिवशी अंबाबाईचे दर्शन घेऊन नवीन वर्षाची मंगलमय सुरुवात करण्याचा भाविकांचा उत्साह पाहायला मिळाला. पहाटेपासूनच मंदिर परिसरात रांगा लागल्या होत्या.
सर्वत्र वेटिंग ः गुरुवारी पहाटेपासूनच पर्यटकांची वर्दळ वाढल्याने दिवसभर हॉटेल्स, पार्किंग, मंदिरे, पर्यटनस्थळे येथे वेटिंग पाहायला मिळत होते. महापालिकेच्या वाहनतळांपासून ते खासगी वाहनतळांपर्यंत पार्किंग करण्यासाठी पर्यटकांची वाहने रांगेत थांबली होती. सायंकाळी सहानंतर रंकाळा तलाव परिसरात पर्यटकांच्या वाहनांचे रस्त्याच्या दुतर्फा पार्किंग लागले होते.
बाजारपेठा गजबजल्या
पर्यटकांच्या वाढलेल्या संख्येमुळे कोल्हापुरातील बाजारपेठाही गजबजून गेल्या होत्या. खाद्यपदार्थांची दुकाने, हॉटेल्स, मिठाई दुकाने, मसाल्यांची दुकाने तसेच महाद्वार रोड येथे गर्दी होती. वाहनांची वर्दळ वाढल्याने काही भागांत वाहतूक कोंडी झाली.