Lakhan Benade murder | लखन बेनाडे खूनप्रकरणी आणखी 6 जणांचा सहभाग
कोल्हापूर : रांगोळी (ता. हातकणंगले) येथील ग्रामपंचायत सदस्य लखन बेनाडे खूनप्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने अटक केलेल्या मारेकर्यांशिवाय आणखी सहा संशयितांचा प्रत्यक्ष सहभाग निष्पन्न होत आहे. संबंधितांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे चौकशी करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले.
संशयितांत कोल्हापूर, इचलकरंजीसह गडहिंग्लज येथील तरुणांचा समावेश आहे. त्यामध्ये काहींचा प्रत्यक्ष खुनाच्या गुन्ह्यात समावेश आहे; तर दोघांनी मारेकर्यांना शस्त्रे पुरविल्याची माहिती पुढे आली आहे.
अश्लील चित्रफीत तयार करून महिलेला ब्लॅकमेल केल्याच्या कारणातून बेनाडे याचे विशाल घस्ते, लक्ष्मी घस्ते, आकाश गस्तेसह 5 जणांनी येथील सायबर चौक-शाहू टोलनाका परिसरातून 10 जुलैला रात्री अपहरण केले होते. धारदार शस्त्रांनी हल्ला करून बेनाडे याचे शिर धडावेगळे करण्यात आले होते. याशिवाय हात-पाय तोडून मृतदेहाचे तुकडे पोत्यात भरून संकेश्वर येथील नदीत फेकून दिले होते.
अटक केलेल्या मारेकर्याशिवाय 6 संशयितांची चौकशीत नावे निष्पन्न झाली आहेत. संबंधितांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आल्याचेही सांगण्यात आले आहे. पोलिस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता यांनीही या वृत्तास दुजोरा दिला आहे.

