

कोल्हापूर : आकर्षक विद्युत रोषणाई, शिगेला पोहोचलेला गोविंदांचा उत्साह, कार्यकर्त्यांचा जल्लोष, संगीताच्या ठेक्यावर थिरकणारी तरुणाई, उपस्थितांची हुरहुर, उत्कंठा अशा उत्साही व जल्लोषी वातावरणात धनंजय महाडिक युवा शक्ती दहीहंडीचा सोहळा दसरा चौक मैदानात पार पडला. कुटवाड (ता. शिरोळ) येथील नृसिंह गोविंदा पथकाने श्वास रोखायला लावत नियोजनबद्ध व चपळाईने सात थर रचून 38 फूट उंचीवर दहीहंडी फोडून युवा शक्तीच्या दहीहंडीवर सुवर्ण अक्षराने नाव कोरले.
खा. धनंजय महाडिक युवा शक्तीच्या दहीहंडीचे रविवारी सायंकाळी मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन झाले. याप्रसंगी खा. शाहू महाराज, माजी आ. महादेवराव महाडिक, पालकमंत्री प्रकाश आबिटकर, उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, खा. धनंजय महाडिक यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी विविध क्षेत्रांतील मान्यवरांसह उत्कृष्ट 22 खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. सायंकाळी सहा वाजता दहीहंडी सोहळा सुरू झाला. सार्थक क्रिएशन ग्रुपच्या कलाकारांनी बहारदार जोगवा व मराठी, हिंदी गीतावरील नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली. श्रीमंत ढोल-ताशा पथकाने सोहळ्यात रंग भरला.
त्यानंतर पहिल्यांदाच रत्नागिरी येथील जयभवानी पथकाने सात थर रचत सलामी दिली. आठ वाजता पाऊस सुरू झाल्यावर चार फुटांनी दहीहंडी खाली घेण्यात आली. गडहिंग्लजच्या नेताजी पालकर गोविंदा पथकाने सहा थार रचत उत्सुकता वाढवली. रात्री नऊच्या सुमारास पाच फुटांनी दहीहंडी खाली घेतली गेली. सोडत काढून दहीहंडीचे थर लावणारे अनुक्रमाने सहा संघ ठरविले गेले. पहिल्या फेरीत रत्नागिरीच्या जयभवानी संघाला संधी मिळाली. या पथकाने सहा थर रचले. तासगावच्या शिवनेरी गोविंदा पथकाने सात थर रचून दहीहंडी फोडण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर नृसिह गोविंदा पथक, नेताजी पालकर, संघर्ष ग्रुप व शिवगर्जना गोविंदा पथकांनी नियोजनबद्ध पद्धतीने सात थरांचे मनोरे रचत दहीहंडी फोडण्याचा आपापल्या परीने प्रयत्न केला; मात्र दहहंडीची उंची जास्त असल्याने एकाही गोविंदा पथकाला दहीहंडी फोडता आली नाही; परंतु उपस्थितांचा उत्साह शिगेला पोहोचला होता.
दरम्यान, रात्री पावणे दहाच्या सुमारास आयोजकांनी दीड फुटाने दहीहंडी खाली घेतली. त्यानंतर पुन्हा सहा संघांची सोडत काढून दुसर्या फेरीला सुरुवात झाली. दुसर्या फेरीत सुरुवातीला शिवगर्जना गोविंदा पथकाला संधी मिळाली. या संघाच्या गोविंदांनी उत्साहात सात थर रचून हंडीपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. हंडी फुटणार असे वाटत असतानाच शेवटच्या थराचा गोविंदा घसरला आणि उपस्थितांच्या काळजाचा ठोका चुकला. भरपावसात खचाखच भरलेल्या मैदानात नागरिकांना दहीहंडी कोण फोडणार, याची उत्सुकता लागली होती. दुसरी संधी कुटवाडच्या नृसिंह गोविंदा पथकाला मिळाली. या संघाने नियोजनबद्ध रितीने सात थर लावले. सातव्या थरावर गोविंदा राजवर्धन पाटील याने उत्साहात हंडीवर काठी मारून युवा शक्ती दहीहंडीवर नाव कोरले. यावेळी गोविंदा पथकांनी फटाक्याच्या आतषबाजीत एकच जल्लोष केला. विजेत्या संघास खा. महाडिक यांच्या हस्ते तीन लाखांचा धनादेश देण्यात आला. परीक्षक म्हणून उत्तम पाटील, इंद्रजित जाधव, सागर बगाडे, राजेंद्र बनसोडे, विजय टिपुगडे, अनंत यादव, विनायक सुतार यांनी काम पाहिले.
युवा शक्तीच्या दहीहंडी सोहळ्यात भरपावसात पहिल्यापासूनच पथकामध्ये चुरस होती. जास्तीत जास्त थर रचण्याचे प्रयत्न करण्यात आले. यात पथकातील चार गोविंदा जखमी झाले. त्यांना तत्काळ रुग्णवाहिकेतून उपचारासाठी नेण्यात आले. सीपीआरमध्ये गोविंदांवर उपचार करण्यात आले.