

Kolhapur Kurundwad Village Bandh
कुरुंदवाड : कुरुंदवाड पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील एका गावातील पीडित विद्यार्थिनीचा लैंगिक छळ करणारा हायस्कुलचा शिक्षक अजित दिवटे याला तात्काळ अटक करावी, सेवेतून बडतर्फी करावी, संस्थेचे चेअरमन, पीडितेच्या कुटुंबियावर आर्थिक दबाव टाकणारा शिक्षक आणि दमदाटी करणाऱ्या मटका व्यावसायिकावर सहआरोपी म्हणून गुन्हा दाखल करावा, या मागण्यांसाठी सोमवारी (दि.२७) हायस्कूलला टाळे ठोकून बेमुदत शाळा व गावबंद आंदोलनाला इशारा ग्रामस्थांनी आज दिला.
सोमवारी सायंकाळी कुरुंदवाड पोलीस ठाण्याच्या प्रांगणात ठिय्या आंदोलन करण्याचा एकमुखी ठराव सर्वपक्षीय बैठकीत करण्यात आल्याची घोषणा सरपंच रेखा जाधव यांनी केली. गावच्या सांस्कृतिक हॉलमध्ये शनिवारी (दि.२५) सकाळी सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी, ग्रामस्थ, सामाजिक कार्यकर्ते आणि विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. बैठकीत उपस्थितांनी विद्यार्थिनीला न्याय मिळवून देण्यासाठी आंदोलन तीव्र करण्याचा निर्धार करण्यात आला.
यावेळी सुकुमार पाटील म्हणाले की, घटना घडून इतके दिवस उलटूनही शिक्षण अधिकाऱ्यांनी पीडित विद्यार्थिनीची भेट घेऊन साधी विचारपूस केली नाही, की शाळेत जाऊन परिस्थितीची पाहणी केली नाही, विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत शिक्षण विभागाची उदासीन भूमिका अत्यंत निषेधार्ह आहे.
यावेळी बंडू पाटील म्हणाले की, या प्रकरणात कोणाचाही राजकीय, आर्थिक किंवा सामाजिक दबाव सहन केला जाणार नाही. या नराधम शिक्षकाची केस कोणत्याही वकिलांनी घेऊ नये, त्या शिक्षकाला कडक शासन करण्यासाठी जलद न्यायालयात कामकाज चालवावे, अशी आमची मागणी आहे.
यावेळी उपसरपंच प्रमोद माळगे, सदस्य अफसर मकानदार, हयातचंद जमादार,बंडू बरगाले,संजय पुजारी, दयानंद पाटील, धनंजय सौदे, सागर वाळके, बंडू मोदी, असिफ विजापूरे, विशाल जाधव, लियाकत चांदखान आदी ग्रामस्थ उपस्थित होते.