

कुरुंदवाड : पुढारी वृत्तसेवा कुरुंदवाड शहरात अज्ञात रोगाने मेलेल्या गावठी डुकरांची विल्हेवाट लावण्याऐवजी अनवडी नदीत टाकून नदी प्रदूषित केल्याचा प्रकार समोर आला आहे. सार्वजनिक लोकवस्तीच्या ठिकाणी चटाई, पोत्यात मेलेली डुकरे गुंडाळून टाकली. उघड्यावर टाकल्याने नदी व परिसरात यामुळे दुर्गंधी सुटली. या दुर्गंधीमुळे या परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. शहराची स्वच्छता भंग करणाऱ्या डुक्कर मालकांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी नागरिकांमधून केली जात आहे.
दरम्यान 4 ते 6 दिवसांपूर्वी मेलेली डुकरे कुजल्याने गुरुवार पासून नदी परिसरात दुर्गंधी सुटली आहे. नाईक गल्ली परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंध येत असल्याने नागरिक चिंतातुर झाले आहेत.आरोग्य विभाग याकडे कधी लक्ष देणार असा सवाल उपस्थित होत आहे.
कुरुंदवाड शहरात डुकरे पाळणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. अज्ञात रोगाने ही डुकरे मरून पडत आहेत. डुक्कर मालकांनी या मृत डुकराची नैसर्गिक पद्धतीने विल्हेवाट न लावता सिमेंटच्या पोत्यात,चटाईत,बरदानात गुंडाळून काही डुकरे अनवडी या उपनदीत टाकली आहेत. त्यामुळे अनवडी नदी पूर्णपणे प्रदूषित झाली आहे. तसेच नगरपालिका कचरा टाकत असल्याच्या ठिकाणी टाकली आहेत.
तर शहरातील जुना शिरढोण रस्त्याच्या पुलाजवळ लिंबू चौकात भर वस्तीच्या ठिकाणीही मृत डुकरे टाकण्यात आली आहेत. ही मृत डुकरे गेल्या आठ ते दहा दिवस झाल्याने सदरची डुकरे कुजल्याने या परिसरामध्ये मोठी दुर्गंधी सुटली आहे. हा परिसर दुर्गंधीयुक्त प्रदूषित झाला आहे.गेल्या दोन दिवसांपासून दुर्गंधी सुटल्याने हा प्रकार उघडकीस आला. याबाबत आरोग्य विभागाला कोणतीच माहिती नाही का? असा सवाल नागरिकांतून उपस्थित होत आहे. पालिका प्रशासनाबद्दल तीव्र संताप व्यक्त होत आहे.
अज्ञात रोगाने डुकरे मृत होत असल्याने या रोगाचे संसर्ग होऊन इतर जनावरांना याची लागण होऊ नये या दृष्टिकोनातून शहरातील इतर फिरत असलेल्या डुकरांना फिरण्यास मज्जाव करणे गरजेचे आहे. पालिका प्रशासनाने याबाबत ठोस पावले उचलावीत आणि नागरिकांचे आरोग्य आणि जनावरांचे आरोग्य धोक्यात येण्यापासून वाचवावे अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
हेही वाचा :