

कुरुंदवाड : तेरवाड–सलगर–सदलगा मार्गावर रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास मोपेड व चारचाकी वाहनामध्ये झालेल्या भीषण अपघातात दोन सख्खे भाऊ गंभीर जखमी झाले. अपघाताची तीव्रता इतकी होती की चारचाकी वाहनाचा समोरचा भाग पूर्णपणे चक्काचूर झाला आहे.
या अपघातात ऋत्विक सुधाकर कांबळे (वय २५) व कार्तिक सुधाकर कांबळे (वय २३, दोघे रा. तेरवाड, ता. शिरोळ) हे दोघे भाऊ गंभीर जखमी झाले आहेत. दोघेही वीटभट्टीवर मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. प्रखर उन्हामुळे दिवसा काम करणे शक्य नसल्याने ते रात्रीच्या पाळीत कामासाठी जात होते. रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास ते इलेक्ट्रॉनिक मोपेडवरून भट्टीकडे निघाले होते.
मारुती स्विफ्ट डिझायर (क्र. GA 06 E 1584) या चारचाकी वाहनातून पती-पत्नी तेरवाडहून कुरुंदवाडकडे येत असताना मागून येणाऱ्या या वाहनाने मोपेडला जोरदार धडक दिली. धडकेच्या तीव्रतेमुळे दोन्ही भाऊ रस्त्यावर फेकले जाऊन गंभीर जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. जखमींना प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी सांगली येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते.
या अपघातात मोपेडचे तुलनेने कमी नुकसान झाले असले तरी चारचाकी वाहनाचा समोरचा भाग पूर्णपणे चक्काचूर झाला आहे. वाहनांची स्थिती पाहून अपघाताची तीव्रता लक्षात येत असून वाहनाचा वेग जास्त असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून अपघातग्रस्त दोन्ही वाहने ताब्यात घेऊन जप्त करण्यात आली आहेत. पुढील तपास सुरू आहे.