

इचलकरंजी : इचलकरंजी शहरात दहशत माजवण्यासह विविध गंभीर गुन्हे दाखल असलेल्या कुख्यात कुचनूर गँगच्या दोघांना एक वर्षासाठी जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे. यामध्ये या गँगचा म्होरक्या रियाज इमाम कुचनूर (45, रा. म्हसोबा गल्ली) व त्याचा साथीदार बजरंग रामचंद्र चौधरी (54, रा. चांदणी चौक, इचलकरंजी) या दोघांचा समावेश आहे. याबाबतचे आदेश जिल्हा पोलिस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता यांनी जारी केले आहेत.
इचलकरंजी शहर व परिसरात सामाजिक हिताला बाधा व धोकादायक ठरणार्या टोळ्यांवर हद्दपारीच्या कारवाईबाबत जिल्हा पोलिस अधीक्षक गुप्ता यांनी आदेश दिले होते. यानुसार गावभाग पोलिसांनी कुचनूर गँगच्या रियाज कुचनूर व बजरंग चौधरी या दोघांच्या हद्दपारीचा प्रस्ताव पाठवला होता. या प्रस्तावाच्या चौकशीसाठी करवीर उपविभागीय अधिकारी यांची नियुक्ती केली होती. त्यांनी याबाबतचा अहवाल पोलिस अधीक्षक यांना सादर केला होता. त्याला मंजुरी देण्यात आली. त्यामुळे दोघांवर हद्दपारीची कारवाई करण्यात आली. कुचनूर गँगवर मोटारसायकल चोरी व घरफोडीचे विविध गुन्हे दाखल आहेत.