

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा : ‘सैराट’ फेम अभिनेत्री रिंकू राजगुरू (Rinku Rajguru) आणि खासदार धनंजय महाडिक यांचे सुपुत्र कृष्णराज महाडिक (Krishnaraj Mahadik) यांचे अंबाबाई मंदिराच्या आवारातील एकत्रित छायाचित्र बुधवारी प्रचंड व्हायरल झाले. महाडिक यांनीच आपल्या इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर हे छायाचित्र अपलोड केल्यानंतर चर्चेला उधाण आले. यावर थोड्याच वेळात शेकडो कमेंटस् आणि लाईकचा वर्षाव झाला.
‘सैराट’ सिनेमाने रातोरात प्रसिद्धी मिळालेली अभिनेत्री रिंकू राजगुरू ही एका कार्यक्रमासाठी जयसिंगपूर येथे आली होती. कार्यक्रमातील सहभागानंतर रिंकू राजगुरू अंबाबाई दर्शनासाठी आली. अंबाबाईचे दर्शन घेतल्यानंतर मंदिराच्या आवारात कृष्णराज महाडिक यांच्यासोबत तिने फोटो क्लिक केला. या फोटोमध्ये कृष्णराज महाडिक आणि रिंकू राजगुरू या दोघांच्याही कपाळावर कुंकवाचा टिळा पाहायला मिळतो. त्यामुळे कृष्णराज आणि रिंकू यांनी एकत्र अंबाबाईचे दर्शन घेण्यामागे काही वेगळे कारण आहे का, अशी चर्चा कृष्णराज आणि रिंकू या दोघांच्याही चाहत्यांमध्ये चांगलीच रंगली.
अभिनेत्री म्हणून रिंकू राजगुरू हिचा मी चाहता आहे. ती जयसिंगपूरमध्ये एका कार्यक्रमासाठी आली होती. माझी रिंकू सोबत जुनी ओळख असल्याने मी तिला अंबाबाईच्या दर्शनाला घेऊन गेलो. तेथील या फोटोवरून चर्चा सुरू आहे; पण तसं आमच्यात काहीच नाही, अशी प्रतिक्रिया कृष्णराज महाडिक यांनी दिली.