

कुरुंदवाड : अवघ्या सहा दिवसांपूर्वी उतरता दक्षिणद्वार सोहळा अनुभवल्यानंतर शुक्रवारी पहाटे कृष्णा नदीच्या पाणीपातळीने 31 फूट पाच इंचांची पातळी गाठताच नृसिंहवाडीत पुन्हा एकदा ‘श्री गुरुदेव दत्त’चा गजर झाला. उगवत्या सूर्याच्या साक्षीने कृष्णामाईने दत्तप्रभूंच्या पादुकांना अभिषेक घालत या वर्षातील दुसरा ‘चढता’ दक्षिणद्वार सोहळा अत्यंत भक्तिमय आणि भावपूर्ण वातावरणात झाला.
गुरुवारपासूनच आतुरतेने वाट पाहिली जात होती. अखेर शुक्रवारी पहाटे पाणी मंदिरात पोहोचताच सांगली, कोल्हापूर, बेळगावसह कर्नाटकातील हजारो भाविकांनी या पुण्यसोहळ्याचे दर्शन घेतले. कृष्णामाईने पुन्हा एकदा दत्तप्रभूंच्या सेवेसाठी धाव घेतल्याची भावना भाविकांमध्ये होती.
स्थानिक प्रशासन आणि श्री दत्त देवस्थान समितीने भाविकांच्या सुरक्षिततेसाठी आणि सोयीसाठी चोख नियोजन केले होते. नदीपात्रात विशेष खबरदारी घेण्यात आली होती. एकाच पावसाळ्यात दोनवेळा दक्षिणद्वार सोहळा संपन्न होण्याची ही एक दुर्मीळच घटना मानली जात आहे.
दरवर्षी पावसाळ्यात कृष्णा नदीची पातळी वाढल्यावर मंदिराच्या उत्तर द्वारातून पाण्याचा प्रवाह सुरू होतो. हे पाणी श्री दत्त महाराजांच्या मनोहर पादुकांवरून प्रवाहित होत दक्षिण द्वारातून बाहेर पडते. भाविक याठिकाणी तीर्थस्नान करतात.