Vinay Kore | झालं गेलं पाठीवर टाकू, महायुती म्हणून एकत्र लढू; गोकुळवरून महायुतीमधील वादावर आ. कोरेंची मध्यस्थी

कोल्हापूर : ‘गोकुळ’ निवडणूक संदर्भात महायुतीच्या प्रमुख नेत्यांची रेसिडेन्सी क्लब येथे बैठक झाली.  यावेळी उपस्थित मंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री हसन मुश्रीफ, खा. धनंजय महाडिक, पालकमंत्री प्रकाश आबिटकर, आ. विनय कोरे, समित कदम व आ. अमल महाडिक.
कोल्हापूर : ‘गोकुळ’ निवडणूक संदर्भात महायुतीच्या प्रमुख नेत्यांची रेसिडेन्सी क्लब येथे बैठक झाली. यावेळी उपस्थित मंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री हसन मुश्रीफ, खा. धनंजय महाडिक, पालकमंत्री प्रकाश आबिटकर, आ. विनय कोरे, समित कदम व आ. अमल महाडिक. (छाया : पप्पू अत्तार)
Published on
Updated on

कोल्हापूर : गोकुळवरून महायुतीमधील नेत्यांमध्ये मागील काळात जो काही वाद, आरोप-प्रत्यारोप झाले, मने दुखावली हे सर्व पाठीवर टाकू आणि महायुती म्हणून निवडणूक एकत्र लढू, अशी मध्यस्थी करत जनसुराज्य शक्ती पक्षाचे संस्थापक आ. विनय कोरे यांनी तूर्तास तरी महायुती नेत्यांमधील वादावर पडदा टाकला. तसेच येथून पुढे घरातल्या घरात वाद नको, एकमेकांवर टीका, उणीदुणी न काढण्याचा निर्णयही बैठकीमध्ये झाल्याचे समजते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानुसार गोकुळ निवडणुकीसंदर्भात महायुतीच्या प्रमुख नेत्यांची शनिवारी रेसिडेन्सी क्लब येथे बैठक झाली. जनसुराज्यचे समित कदम यांनी बैठकीचे नियोजन केले. प्रारंभी मंत्री मुश्रीफ यांनी महायुतीच्या नेत्यांवर नाराजी व्यक्त केली. गोकुळमध्ये प्रशासक निवडताना यादी का दाखवण्यात आली नाही, मी महायुतीचा घटक नाही का, असा सवाल केला. खा. धनंजय महाडिक, आ. अमल महाडिक यांनी गोकुळमधील चौकशी करणार्‍यांच्या पाठीशी कोण आहे, याबाबत आम्हाला कल्पना नसल्याचे सांगत महायुती म्हणून आम्ही गोकुळच्या एकाही प्रकरणावर भाष्य केले नसल्याचा खुलासा केला. यावर आ. कोरे यांनी झालं गेलं गंगेला मिळालं. मागील घडामोडींवर चर्चा न करता निवडणूक एकत्र लढू, असे सांगितले. पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनीदेखील महायुती म्हणून एकत्र लढूया, असे स्पष्ट केले.

जसे ठराव, तसे जागा वाटप

मंत्री चंद्रकांत पाटील यांनी जागा वाटपाबाबत ज्यांच्याकडे जसे ठराव येतील त्यानुसार जागावाटप करू; मात्र जागा वाटपाचा अंतिम फॉर्म्युुला मुख्यमंत्री ठरवतील, असे स्पष्ट केले. तसेच येथून पुढे नेत्यांमध्ये मतभेद होता कामा नये, अशी सूचना केली.

आ. चंद्रदीप नरके, आ. शिवाजी पाटील यांची अनुपस्थिती

गोकुळ निवडणूक प्रक्रियेत आ. चंद्रदीप नरके, आ. शिवाजी पाटील अनुपस्थित होते. मंत्री मुश्रीफ आणि आमदार पाटील यांच्यामध्ये टोकाचा संघर्ष असल्याने त्यांच्यामधील वाद मिटण्यासाठी आ. पाटील यांची बैठकीला उपस्थिती महत्त्वाची होती; मात्र त्यांना बैठकीचे निमंत्रण नसल्याचे समजते. तसेच गोकुळमध्ये आमदार नरके यांचीदेखिल भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. त्यामुळे बैठकीला त्यांची अनुपस्थितीही चर्चेची ठरली; मात्र शिवसेनेकडून पालकमंत्री आबिटकर बैठकीला उपस्थित असल्याचे सांगण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news