

कोल्हापूर : राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी अवमानकारक वक्तव्य केल्याप्रकरणी गुन्हा दाखल होताच फरार झालेल्या प्रशांत कोरटकरला बुकीमालक धीरज चौधरीसह प्रशिक पडवेकर, हिफायत अली, राजेंद्र जोशी, साईराज पेटकर यांनी मदत केली आहे. पोलिसांना चकवा देण्यासाठी त्याने या मित्रांकडील आलिशान मोटारींचा वापर केल्याचा युक्तिवाद ज्येष्ठ विधिज्ञ अॅड. असीम सरोदे यांनी शुक्रवारी न्यायालयात केला. दरम्यान, यापैकी एक आलिशान मोटार पोलिसांनी ताब्यात घेतली आहे.
सामाजिक शांतता धोक्यात आणू पाहणार्या प्रशांत कोरटकरचा समाजविघातक हेतू लक्षात घेता त्याच्या कृत्यात प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सहभागी असलेल्यांची कसून चौकशीची गरज आहे. तीन दिवसांच्या पोलिस कोठडीत नागपूर, गडचिरोली, चंद्रपूर, तेलंगणासह सिकंदराबाद येथील त्याच्या मित्रांची नावे निष्पन्न झाली आहेत. त्यामुळे तपासाच्या द़ृष्टीने कोरटकरला आणखी पाच दिवसांची पोलिस कोठडी वाढवून मिळावी, अशीही विनंती इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांचे वकील व ज्येष्ठ विधिज्ञ असीम सरोदे यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयाकडे केली.
असीम सरोदे म्हणाले, कोल्हापूरचे पोलिस कोरटकरच्या शोधात असताना त्याने रोज वेगवेगळ्या महागड्या हॉटेल्समध्ये वास्तव्य केल्याचे निष्पन्न झाले आहे. हॉटेलमधील खोल्या कोणाच्या नावावर बुक केल्या, त्याचा खर्च कोणी भागविला, पलायनासाठी कोरटकरने चार आलिशान मोटारींचा वापर केला आहे. या मोटारी गुन्ह्यात जप्त करण्याची आवश्यकता आहे. कोरटकर महिनाभर फरार होता. त्याचा दररोजचा खर्च कोणी केला, यामध्ये कोणत्या संघटनेचा सक्रिय सहभाग आहे का, असल्यास त्याचा हेतू तपासावा लागेल, असेही सरोदे म्हणाले.
25 फेब—ुवारीला प्रशांत कोरटकरने इंद्रजित सावंत यांना मोबाईलद्वारे संपर्क साधला. शिवीगाळ करीत जीवे मारण्याची धमकी दिली. शिवाय राष्ट्रपुरुषांची नावे घेऊन त्यांच्याविषयी जाणीवपूर्वक अवमानकारक वक्तव्ये केली. या प्रकरणात त्याच्याशिवाय आणखी काही साथीदारांचाही समावेश असण्याची शक्यता नाकारता येत नाही. कोरटकर पोलिसांच्या काही महत्त्वाच्या प्रश्नांना बगल देतो, पोलिस कोठडीची मुदत वाढविल्यास पडद्याआडचे सहकारी पोलिस रेकॉर्डवर येतील, असेही अॅड. सरोदे यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणले.
सरकारी वकील अॅड. सूर्यकांत पवार युक्तिवाद करताना म्हणाले, प्रशांत कोरटकरने सामाजिक तणाव करण्याच्या हेतूने नियोजनपूर्वक गुन्हा केला आहे. या कृत्यामागे त्याच्यासह साथीदारांचा वेगळा कट असल्याचा संशय आहे. साथीदारांची नावे चौकशीत निष्पन्न झाली आहेत. संशयितांना अटक करून गुन्ह्यात वापरलेली वाहने जप्त करण्यासाठी कोरटकरच्या पोलिस कोठडीत पाच दिवसांची वाढ करावी, अशी विनंतीही त्यांनी न्यायालयाला केली. यावेळी सहायक तपासाधिकारी संतोष गळवे यांनीही युक्तिवाद केला. तपासात अनेक बाबींचा उलगडा होण्यासाठी कोरटकरला पोलिस कोठडी वाढवून मिळावी, अशी गळवे यांनी विनंती केली. युक्तिवाद सुरू असताना ज्येष्ठ विधिज्ञ असिम सरोदे व अॅड. सौरभ घाग यांच्यात दोन-तीन वेळा शाब्दिक खडाजंगी झाली. त्यावर न्यायाधीशांना हस्तक्षेप करावा लागला. दोन्ही बाजूकडून युक्तिवाद झाल्यानंतर चौथे दिवाणी न्यायाधीश (क. स्तर) एस. एस. तट यांनी कोरटकर याच्या पोलिस कोठडीची मुदत दोन दिवसांसाठी वाढविण्यात येत असल्याचे सांगितले. सुनावणीवेळी इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत, हर्षल सुर्वे यांच्यासह वकिलांची लक्षणीय उपस्थिती होती.
संशयित प्रशांत कोरटकर याचे वकील अॅड. सौरभ घाग म्हणाले, प्रशांत कोरटकरने तीन दिवसांच्या पोलिस कोठडीत पोलिसांना सहकार्य केले आहे. तपास पूर्ण झाला आहे. शिवाय चौकशीत पोलिस ज्यावेळी बोलावतील त्यावेळी कोरटकर स्वत: चौकशी अधिकार्यांसमोर हजर होईल. कोरटकरच्या घरी वृद्ध आई, पत्नी व लहान मुलगी आहे. जिल्हा व सत्र न्यायालयाने त्यास काही काळ तात्पुरता दिलासा दिला होता. त्यामुळे फरारी... फरारी... असा उल्लेख करणे कितपत योग्य आहे, असा सवाल कोरटकरच्या वतीने युक्तिवाद करताना अॅड. घाग यांनी केला.