

khidrapur kopeshwar temple
कुरुंदवाड : जमीर पठाण
खिद्रापूर (ता. शिरोळ) येथील प्राचीन आणि कलात्मक वैभवाने नटलेले भगवान कोपेश्वर मंदिर बुधवारी रात्री त्रिपुरारी पौर्णिमेच्या शितल चंद्रप्रकाश सोहळ्याने उजळून निघणार आहे. वर्षातून एकदाच घडणाऱ्या या अद्भुत आणि दुर्मिळ खगोलीय योगायोगाच्या साक्षीदार होण्यासाठी महाराष्ट्र, कर्नाटक आणि गोवा या राज्यांतून भाविक, पर्यटक मोठ्या संख्येने खिद्रापूरात दाखल झाले आहेत.
बुधवारी रात्री 11: 42 वाजण्याच्या सुमारास स्वर्गमंडपातील वर्तुळाकार झरोक्यातून पौर्णिमेचा चंद्र मध्यभागी येतो आणि खाली असलेल्या वर्तुळाकार दगडावर ‘चंद्रशीला’वर त्या तेजोमय चंद्राचा कवडसा पडतो. स्वर्गमंडप, खांब आणि शिल्पाकृतींवर तो चंद्रप्रकाश सांडताच मंदिर परिसर अलौकिक तेजाने न्हाऊन निघतो. या अद्भुत दृश्याला ‘शितल चंद्रप्रकाश सोहळा’ असे संबोधले जाते.
सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर दीपोत्सव, त्रिपुरा प्रज्वलन आणि महाआरतीचे आयोजन करण्यात आले आहे. मंदिराच्या प्रांगणात भक्तांनी आकर्षक रांगोळ्या काढण्यात येणार असून भजन, कीर्तन, आणि पारंपरिक वाद्यांच्या तालावर भक्तिगीतांचा निनाद होणार आहे.
मुंबई, पुणे, सोलापूर, सातारा, रत्नागिरी, महाबळेश्वर तसेच कर्नाटक आणि गोवा राज्यांतील भाविक या दुर्मिळ चंद्रयोगाचे साक्षीदार होण्यासाठी प्रत्येकवर्षी हजर होतात. मंदिर परिसरात प्रशासन आणि ग्रामस्थांतर्फे वाहतूक, स्वच्छता आणि सुरक्षा व्यवस्थेची उत्तम तयारी करण्यात येत आहे.
खिद्रापूर हे कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील सीमावर्ती गाव असून, सांगली जिल्ह्याच्या अगदी जवळ तसेच कर्नाटक राज्यातील कागवाड–चिकोडी तालुक्याच्या सीमेवर वसलेले आहे.
●कुरुंदवाडहून अंतर : सुमारे १७ किलोमीटर.
●कसे जायचे : कुरुंदवाड–नृसिंहवाडी–खिद्रापूर असा मार्ग सर्वात सोयीचा आणि सुकर असून सर्व प्रकारच्या वाहनांनी सहज प्रवास करता येतो.
●पर्यायी मार्ग : शिरोळ–इचलकरंजी–कुरुंदवाड–खिद्रापूर.
●जवळचे रेल्वे स्थानक : जयसिंगपूर आणि मिरज हे जवळचे रेल्वे स्थानक असून येथून रस्तामार्गे प्रवास सुलभ आहे.
●जवळचे विमानतळ : कोल्हापूर विमानतळ (पुणे–मुंबईसाठी उड्डाणे उपलब्ध)