

सुनील कदम
कोल्हापूर : कोकणातील वाया जाणारे पाणी सह्याद्रीतील समतल पातळी कॅनॉलमध्ये साठवून ते पाणी बोगद्यांच्या माध्यमातून राज्याच्या दुष्काळप्रवण भागाकडे वळविण्याची योजना आहे. या योजनेला सद्यस्थितीत ३० ते ४० हजार कोटी खर्च अपेक्षित आहे.
राज्यात ५० ते ६० किलोमीटर रुंद आणि ७२० किलोमीटर लांबीची कोकण किनारपट्टी आहे. या किनारपट्टीलगत समुद्र सपाटीपासून ५०० ते १६०० मीटर उंचीची सह्याद्रीची पर्वतरांग आहे. या पर्वतरांगेच्या कड्यालगत समुद्र सपाटीपासून ५७५ ते ५८५ मीटर उंचीवर ५ मीटर रुंद व ५ मीटर उंचीचा काँक्रीट कॅनॉल तयार करणे. हा कॅनॉल सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या गोवा सीमेपासून ते गुजरात सीमेपर्यंत ७०० ते १००० किलोमीटर लांबीचा असेल. या कॅनॉलची साठवण क्षमता ही संपूर्ण कोकणात एका दिवसात पडणारा कमाल पाऊस साठवण्याइतकी असेल. हेच पाणी वेगवेगळ्या ठिकाणच्या बोगद्यांमधून उर्वरित महाराष्ट्राकडे वळवायचे आहे.
कॅनॉलपासूनचा पहिला बोगदा राधानगरी धरणापर्यंत येईल. यातून येणारे पाणी पुढे पंचगंगा, कृष्णा, वारणा नद्यांद्वारे सांगली, सोलापूरसह मराठवाड्यात नेता येईल.
दुसरा बोगदा कोयना धरणामध्ये प्रवेश करेल आणि त्यातून येणारे पाणी कोयना-कृष्णा नद्यांच्या माध्यमातून मराठवाड्याकडे वळविता येईल.
तिसरा बोगदा नीरा नदीमार्गे वीर धरणापर्यंत येऊन त्याचे पाणी अहिल्यानगर, पुणे आणि सोलापूरच्या दुष्काळप्रवण भागात जाईल.
चौथा बोगदा हा मुठा नदीमार्गे पुणे जिल्ह्यातील खडकवासला धरणापर्यंत जाईल. पाचवा बोगदा हा घोड प्रकल्पापर्यंत असेल.
सहावा बोगदा नाशिकमधील दारणा धरणापर्यंत असेल. या सर्व बोगद्यांची एकूण लांबी साधारणत: ५० कि.मी. इतकी असेल, असा पी. एन. तोडकर यांचा दावा आहे.
बोगद्यांच्या माध्यमातून कोकणातील किमान ५०० ते १६०० टीएमसी पाणी राज्याच्या उर्वरित भागात वळविता येईल. हे पाणी एका नदीतून दुसऱ्या नदीत किंवा अन्य जलाशयात सोडून राज्याची पाणी साठवण क्षमता किमान ५०० ते ७०० टीएमसीने वाढू शकते. तसे झाल्यास राज्याला दुष्काळाची कधी झळच सोसावी लागणार नाही. त्यामुळे या योजनेबाबत शासनाने गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे.
शासन आजकाल आवश्यक नसणाऱ्या रस्त्यांवर लाख-लाख कोटी रुपये खर्चायला निघाले आहे. अनावश्यक योजनांवर हजारो कोटी रुपयांची उधळपट्टी केली जात आहे. ते टाळून शासनाने कोकणातील वाया जाणारे पाणी दुष्काळी भागाकडे वळविण्याच्या पी. एन. तोडकर यांच्या योजनेवर तो पैसा खर्च करावा. ही योजना झाली तर बहुतांश दुष्काळी तालुके दुष्काळमुक्त होतील. शेतकऱ्यांचे भले करायचे असेल तर शासनाने ही योजना राबविण्याची आवश्यकता आहे.
रघुनाथदादा पाटील, ज्येष्ठ नेते शेतकरी संघटना, महाराष्ट्र राज्य
* ७२० किलोमीटर लांबीची कोकण किनारपट्टी लाभली आहे महाराष्ट्राला
* ५०० ते १६०० मीटर उंचीची सह्याद्री पर्वतरांग आहे या किनारपट्टीलगत
* ७५ ते ५८५ मीटर उंचीवर काँक्रीट कॅनॉल पर्वतरांगेच्या कड्यालगत शक्य
* ७०० ते १००० किलोमीटर लांबीचा गुजरात सीमेपर्यंत असेल हा कॅनॉल
* ०६ बोगदे कॅनॉलला जोडून तयार केल्यास या माध्यमातून कोकणातील
* किमान ५०० ते १६०० टीएमसी पाणी राज्याच्या उर्वरित भागात वळविता येईल.