Kolhapur-Vaibhavwadi Railway Line | आता नेमके कसले सर्वेक्षण करणार?

कोल्हापूर-वैभववाडी रेल्वे मार्गासाठी ३६ वर्षांनीही हाती फक्‍त धुपाटणेच
Kolhapur-Vaibhavwadi Railway Line |
Kolhapur-Vaibhavwadi Railway Line | आता नेमके कसले सर्वेक्षण करणार?File Photo
Published on
Updated on

राजेंद्र जोशी

कोल्हापूर : कोल्हापूर-वैभववाडी रेल्वे मार्गासाठी ७ सर्वेक्षणे झाली आहेत. २०१० पर्यंत यातील दोन सर्वेक्षणे पूर्ण झाली होती. २०१० मध्ये महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाच्या विनंतीवरून कोकण रेल्वे कार्पोरेशनने प्राथमिक आर्थिक व्यवहार्यता सर्वेक्षण केले. त्याचा अहवाल एप्रिल २०१० मध्ये सादर करण्यात आला, मग आता परत नेमके कसले सर्वेक्षण करणार? असा प्रश्‍न कोल्‍हापूर, कोकणातील सर्वसामान्‍य जनतेला पडला आहे. ३६ वर्षांच्‍या मागणीनंतरही हाती फक्‍त धुपाटणेच आल्‍याची भावना व्‍यक्‍त होत आहे.

३ जानेवारी २०१५ रोजी दैनिक ‘पुढारी’चा अमृत महोत्सव साजरा झाला. या समारंभाला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी दैनिक ‘पुढारी’चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव यांनी कोल्हापूर खंडपीठासह कोकण रेल्वेच्या मागणीचा जोरदार पुरस्कार केला. यानंतर लगेचच ४ मे २०१५ मध्ये जे. पी. इंजिनिअरिंग या कंपनीकडून प्रत्यक्ष आणि उपग्रहाद्वारे सर्वेक्षण सुरू झाले. यानंतर २०१६ मध्ये प्रकल्पाला रेल्वे अर्थसंकल्पात मंजुरी मिळाल्यानंतर ११ जून २०१७ रोजी तत्कालिन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी अंतिम सर्वेक्षणाला सुरुवात केली.

यानंतर त्याचा बृहत् प्रकल्प आराखडा (डीपीआर) तयार करून तो ७ मे २०१७ रोजी रेल्वे बोर्डाकडे सादर करण्यात आला. ऑक्टोबर २०२३ मध्ये या प्रकल्पाला पंतप्रधान गतिशक्ती प्रकल्पांतर्गत पुढे नेण्याची शिफारस करण्यात आली. साहजिकच, गतिशक्तीच्या विभागाने त्याचे तांत्रिक सर्वेक्षण केले आणि २०२६ मध्ये लेझर किरणांच्या सहाय्याने जमिनीची उंच-सखल रचना मोजणारे (एलआयडीएआर) हवाई सर्वेक्षणही करण्यात आले. मध्यंतरी या प्रकल्पाचे आणखी एक खंदे पुरस्कर्ते केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी रेल्वे मंत्र्यांची भेट घेतल्यानंतर लवकरच रेल्वे मार्गासाठी भूमीसंपादनाची प्रक्रिया सुरू होत असल्याचे स्पष्ट केले होते. यामुळे या रेल्वे मार्गासाठी दक्षिण महाराष्ट्र आणि कोकणातील जनता डोळे लावून बसलेली असताना नव्या सर्वेक्षणाचा घाट हा प्रकल्पासाठी कात्रजचा घाट ठरू शकतो.

(उत्तरार्ध)

...तर तळकोकणाच्‍या विकासाला चालना

कोल्हापूर-वैभववाडी हा रेल्वे मार्ग देशाची पूर्व-पश्चिम टोके जोडणारा, बंदराशी जवळचा संपर्क ठरणारा आणि तळकोकणाच्या विकासाला मोठी चालना देणारा मार्ग आहे. या मार्गाच्या सभोवताली डोंगर कपारीत राहणार्‍या कुटुंबांना आरोग्य सेवेसाठी गर्भवती महिला वा रुग्णांना झोळीतून घेऊन मैलोन्‌मैल पायपीट करावी लागते. एक रेल्वे मार्ग हजारो कुटुंबांचे जीवन उजळू शकतो. तसेच, उद्योगालाही मोठी चालना मिळू शकते. यासाठीच या मार्गाचा ३६ वर्षे पाठपुरावा सुरू आहे आणि आता जर नव्या सर्वेक्षणाचा घाट घातला जात असेल, तर हा खेळ कोठेतरी थांबविण्याची गरज आहे. कारण, ही केवळ प्रशासकीय दिरंगाई नाही, तर दक्षिण महाराष्ट्र आणि कोकणाच्या जनतेच्या संयमाची परीक्षा घेण्याचा प्रकार सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news