Masai Plateau | कासच्‍या धर्तीवर सौंदर्य खुलणार, मसाई पठार पर्यटनाने बहरणार

वन विभागातर्फे स्वागत कमान, वॉचिंग टॉवर, संरक्षक रेलिंग, फेन्सिंग, माहिती फलक
Masai Plateau |
Masai Plateau | कासच्‍या धर्तीवर सौंदर्य खुलणार, मसाई पठार पर्यटनाने बहरणार
Published on
Updated on

सागर यादव

कोल्हापूर : भर पावसात मसाई पठारावर फुलणाऱ्या वैशिष्ट्यपूर्ण सौंदर्याला सुरक्षेचे कवच प्राप्त होणार आहे. सातारा येथील कास पठाराच्या धर्तीवर कोल्हापुरातील मसाई पठाराचा पर्यटन विकास करण्यात आला असून, येत्या १५ ऑगस्टनंतर याचे लोकार्पण होणार आहे.

मसाई पठार कोल्हापूर शहरापासून ३० ते ३५ कि. मी. अंंतरावर आहे. समुद्र सपाटीपासून ९०० मीटर उंचीवर ५.३४ चौरस कि. मी. क्षेत्रफळ असणाऱ्या पठाराची आशिया खंडातील सर्वात विस्तीर्ण पठार अशी ओळख आहे. संवर्धन राखीव क्षेत्र म्हणून याची जून २०२२ मध्ये घोषणा झाली. सह्याद्री डोंगर रांगेत ज्वालामुखीतून बाहेर पडलेल्या बेसाल्ट दगडात पठाराची निर्मिती झाली आहे. काळी, तांबडी, पांढरी, पिवळी अशा विविध प्रकारची माती पाहायला मिळते.

हिरव्यागार पठारावर पिवळ्या रंगाची सोनकी, नीलवंती, केना, कापरू, रानतेरडा, सफेद गेंद, सीतेची आसवे, रानमंजिरी, सफेद मुसळी, रानहळद, नीलिमा, जंगली सुरण, गोधडी, दीपकाडी दुर्मीळ कंदील पुष्प, पांढरे-गुलाबी कुई आदी विविधरंगी रानफुलांच्‍या १५ वर प्रजाती आढळतात. परिसरात सांबर, माऊस डिअर, वानर, रानडुक्कर, गवे, बिबट्या, मोर, लांडोर, साळिंदर, विविध पक्षी, सर्प व जलचरांचा वावर आहे. मसाई मंदिर अन् पांडव लेणी मसाई देवी मंदिरामुळे पठाराचे नामकरण झाले आहे. तलावातील पाणी नितळ असते. पठाराच्या पश्चिम कड्यात प्राचीन पांडवदरा आणि बौद्ध लेणी आहेत.

असा होतोय पर्यटन विकास

पठाराभोवती संरक्षक ग्रील, स्वागत कमान, वॉचिंग टॉवर, फुलांच्या सुरक्षिततेसाठी तात्पुर्त्या स्वरूपाच्या संरक्षक जाळ्या बसविल्या आहेत. इतिहास व पर्यावरणाच्या माहितीसह सूचना फलक लावले आहेत. रस्ता, पार्किंग व स्वच्छतागृहाची व्यवस्थाही करण्यात आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news