

कोल्हापूर : गेल्या अनेक वर्षांपासून दिल्लीसाठी डोकेदुखी ठरलेल्या महाभयंकर हवा प्रदूषणावर मात करण्यासाठी आता कोल्हापुरी पॅटर्न मैदानात उतरला आहे. कोल्हापूरच्या कोल्हापूरच्या सुमीत संतोष पोवार आणि प्रतिराज तानाजी कुंभार या तरुणांच्या कल्पकतेतून साकारलेले पवन तीन हे यंत्र आता दिल्लीची हवा शुद्ध करण्यासाठी सज्ज झाले आहे. दिल्लीतील मायापुरी येथील सद्गुरू रामसिंह मार्गावर प्रायोगिक तत्त्वावर बसवण्यात आले आहे. शनिवारी मुख्यमंत्री रेखा गुप्ता व पर्यावरण मंत्री मनजिंदर सिंह सिरसा यांनी युनिटला प्रत्यक्ष भेट देऊन यंत्राच्या कार्यपद्धतीची पाहणी करून तरुणांच्या कल्पकतेचे कौतुक केले.
दिल्ली पोल्युशन कंट्रोल कमिटीने आयोजित केलेल्या इनोव्हेशन चॅलेंज या विशेष स्पर्धेत कोल्हापूरच्या तरुणांनी विकसित केलेल्या पवन तीन या वायू प्रदूषण नियंत्रण यंत्राची अंतिम फेरीसाठी निवड झाली. देशभरातून अनेक नवसंशोधकांनी भाग घेतला होता. सध्या हे पवन तीन यंत्र फिल्ड ट्रायल टप्प्यात असून, दिल्लीतील मायापुरी येथील सद्गुरू रामसिंह मार्गावर प्रायोगिक तत्त्वावर बसवण्यात आले आहे. या मशिनची कार्यक्षमता राष्ट्रीय भौतिकशाळेमार्फत तपासली जात आहे. आगामी काळात दिल्लीत हा कोल्हापुरी उपाय राबवला जाणार आहे.
असे काम करते पवन तीन
हे अद्ययावत ‘पवन तीन’ यंत्र परिसरातील दूषित हवा स्वतःकडे वेगाने खेचून घेते. या यंत्रामध्ये खास पद्धतीचे उच्च क्षमतेचे फिल्टर्स बसवण्यात आले आहेत, जे हवेतील आरोग्याला घातक असणारे अतिसूक्ष्म कण म्हणजेच पीएम 2.5 आणि पीएम 10 शोषून घेतात. यामुळे गर्दीच्या आणि वर्दळीच्या ठिकाणी धूलिकणांची पातळी कमी होण्यास मदत होते.