

आशिष शिंदे
कोल्हापूर : कोल्हापूर हा शब्दच एका वैभवशाली कालखंडाची प्रचिती देतो. कोल्हापूरचे शाही राजघराणे, कोल्हापुरी चप्पल अन् कोल्हापुरी तांबडा-पांढरा रस्सा. पण कोल्हापूरची महती एवढ्यावरच थांबत नाही. मधाळ चवीचा कोल्हापुरी गूळही या वैभवात भर घालतो. सुमारे दोनशे वर्षांपूर्वीपासून कोल्हापुरी गुळाचा गोडवा अख्ख्या महाराष्ट्राला परिचित आहे. पण गेल्या 20 वर्षांत कोल्हापुरी गुळाला कुणाची नजर लागली माहीत नाही आणि 1200 वर असलेली गुर्हाळघरे आता 80 वर रोडावली आहेत.
कोल्हापूरच्या तांबड्या मातीत पिकणारा ऊस आणि या उसापासून तयार होणारा गूळ म्हणजे गोडवा. ज्यांनी ज्यांनी या गुळाचा तुकडा जिभेवर ठेवला, त्या प्रत्येकाच्या जिभेवर हा गोडवा कायम आहे. यामुळे जगभरात कोल्हापुरी गुळाची एक वेगळी ओळख निर्माण झाली आहे. सुमारे 1800च्या दशकातही जिल्ह्याची नाडी धडधडत होती गूळ उद्योगावर. ब्रिटिश काळातील दस्तऐवजांनुसार त्यावेळी कोल्हापुरात दरवर्षी 4,296 खंडी म्हणजेच सुमारे 1 हजार टन गूळ तयार होत असे. या गुळाची त्याकाळी बाजारातील वार्षिक उलाढाल तब्बल 1 लाख 20 हजार 539 रुपये इतकी होती. अर्थात त्या काळातील ही रक्कम आजच्या अनेक कोटी रुपयांच्या जवळ जाणारी मानली जाते.
त्याकाळी गुर्हाळघरे हा कोल्हापूरचा दैनंदिन जीवनाचा भाग होता. गूळ उद्योगावर हजारो कुटुंबांची रोजीरोटी अवलंबून होती. गूळ निर्मितीची पद्धतही त्याकाळी संपन्न, संघटित आणि श्रमप्रधान होती. उसाचा रस काढण्यासाठी लाकडी गिरण्या वापरल्या जात. त्या बैलांच्या सततच्या फिरतीवर चालत. हा रस मोठ्या लोखंडी काहिलीत रात्रभर उकळला जाई आणि नंतर जमिनीत बनवलेल्या साच्यांत ओतून 20 ते 30 किलो वजनाचे रवे म्हणजेच गुळांच्या ढेपांत रूपांतर केले जाई. आज मशिनरीने सुसज्ज झालेले आधुनिक ‘जॅगरी युनिटस्’ पाहून त्याकाळची ही पारंपरिक प्रक्रिया अविश्वसनीय वाटते. पण त्यावेळी प्रत्येक गावात ही वर्दळ पाहायला मिळत असे.
आजची बाजारपेठ 66 पटींनी अधिक
आजही कोल्हापूरच्या गुळाची गोडी कायम आहे. गुर्हाळांचे प्रमाण घटले असले तरी बाजारात दरवर्षी मोठ्या प्रमाणावर गूळ विक्री होते. बाजार समित्यांच्या आणि स्थानिक गुर्हाळधारकांच्या नोंदीनुसार कोल्हापुरात प्रतिवर्षी सुमारे 66 हजार टन गुळाची विक्री होते. 1800 च्या दशकात जिथे कोल्हापुरात अवघे एक हजार टन गूळ तयार होत असे, तिथे आज वार्षिक गूळ उत्पादन तब्बल 66 हजार टनांवर पोहोचले आहे. म्हणजे उत्पादनात तब्बल 66 पट. टक्केवारीचा विचार केल्यास 6,500 टक्क्यांची वाढ झाली आहे.
25 गुंठे जमिनीतून गूळ उत्पादनासाठी यायचा 48 रुपये खर्च!
गूळ तयार करण्यासाठी येणारा खर्चदेखील ब्रिटिश काळातील दस्तऐवजांमध्ये अचूक नोंदवला आहे. 25 गुंठे (एक बिघा) जमिनीतील उसापासून गूळ करण्याचा थेट खर्च 47 रुपये 13 पैसे 5 आणे इतका होता; तर ऊस लागवड, देखभाल आणि गूळनिर्मिती मिळून एकूण खर्च 193 रुपये 10 पैसे 9 आणे इतका होत असे. इतक्या खर्चांनंतरही शेतकर्यांना प्रति बिघा 29 रुपये 5 पैसे 9 आणे इतका निव्वळ नफा मिळत असे; तर कमी दर्जाच्या उसावरही 18 रुपये निव्वळ नफा नोंदवला आहे. म्हणजेच गूळ उद्योग हा त्याकाळी पूर्णपणे नफा देणारा प्रमुख ग्रामीण आर्थिक आधार होता, हे दस्तऐवज स्पष्ट करतात.