kolhapur | कोल्हापुरी सुगंधी व्यापार दीड शतकात 200 कोटींवर!

खलबत्त्यात कुटून तयार केलेले शाही अबीर, अत्तर, अगरबत्ती ते लक्झरी परफ्यूमपर्यंत झेप
kolhapur | कोल्हापुरी सुगंधी व्यापार दीड शतकात 200 कोटींवर!
kolhapur | कोल्हापुरी सुगंधी व्यापार दीड शतकात 200 कोटींवर!
Published on
Updated on

आशिष शिंदे

कोल्हापूर : ‘गंध फुलांचा, गंध चंदनाचा दरवळतोय सारा सुगंध’... या ओळी जणू करवीर नगरीच्या सुगंधी इतिहासाचीच कहाणी सांगतात. रांगडा पैलवान, तांबडा-पांढरा रस्सा आणि गुळासह या करवीर नगरीला समृद्ध असा सुगंधी इतिहास देखील आहे. सुमारे दीड शतकापूर्वी कोल्हापुरात चंदन, गुलाब, पाच आणि कस्तुरीचा सुगंध दर्वळत होता. खलबत्त्यात कुटून तयार केल्या जाणार्‍या शाही अबीर आणि अगरबत्ती म्हणजे कोल्हापूरची एक वेगळी ओळख होती. त्याकाळी अवघ्या 2,500 रुपयांची वार्षिक उलाढाल असणार्‍या कोल्हापूरच्या सुगंधी उद्योगाने आज वार्षिक 200 कोटींचा टप्पा ओलांडला आहे.

दीड शतकापूर्वी कोल्हापुरात दगडी खलबत्त्यात कुटून शाही अबीर आणि अगरबत्ती तयार केली जात होती. यात गुलाबाची सुकलेली फुले, वाळा, चंदन, नागरमोथा आणि कस्तुरी यांसारखे 15 नैसर्गिक घटक असायचे. यामुळे अगरबत्तीचा सुगंध सर्वत्र दरवळायचा. कस्तुरीयुक्त सुपीरियर अबीर 4 रुपये प्रति शेर, तर कस्तुरीविना असलेले अबीर 14 आणे दराने त्याकाळी मिळे. त्यावेळी 2 हजार रुपये खर्चात 500 रुपयांचा निव्वळ नफा उत्पादकांना होत असे.

कस्तुरी होते तेव्हाचे सर्वात महागडे द्रव्य

कस्तुरी हे 1851 साली सर्वात महागडे सुगंधी द्रव्य होते. 1/4 तोळा कस्तुरीसाठी 1 रुपया 15 आणे मोजावे लागत. त्याखालोखाल गुलाब आणि पाच अत्तर (8 आणे प्रति 1/4 तोळा) मौल्यवान मानले जाई. 2 तोळे चंदनाचे अत्तर 8 आण्यांना, तर 20 तोळे रोझल ऑईल 6 आण्यांना उपलब्ध होते.

आंतरराष्ट्रीय लक्झरी ब्रँडस्ना कोल्हापुरात पसंती

आज पारंपरिक अत्तरांसह आंतरराष्ट्रीय लक्झरी ब्रँडस्ना कोल्हापुरात पसंती आहे. अत्तरांच्या किमती 25 रुपये ते हजार रुपये (प्रति 1 मिली) असून, 35 हजारांहून अधिक किमतीचे परफ्यूम्स कोल्हापूरकर आवडीने खरेदी करत आहेत. कोल्हापुरात सध्या महिन्याला 18 ते 20 कोटींची उलाढाल होत असून, लक्झरी ब्रँडस्ना मोठी मागणी आहे, असे व्यापार्‍यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news