

कोल्हापूर : इटलीतील मिलान येथे झालेल्या फॅशन वीकमध्ये एका जगप्रसिद्ध ब—ँडने आपल्या नव्या कलेक्शनमध्ये भारतीय कोल्हापुरी चप्पलला जागतिक व्यासपीठावर झळकवलं आणि फॅशन जगतात एकच चर्चा झाली. पारंपरिक भारतीय लेदर चप्पल, जी कोल्हापूरमध्ये हाताने तयार केली जाते, ती आता इटालियन लक्झरी ब—ँडच्या शोचा केंद्रबिंदू ठरली; मात्र या शोमध्ये कोल्हापुरी चप्पलच्या नावाचा उल्लेख न केल्याने कोल्हापुरी चप्पलप्रेमींनी सोशल मीडियावर नाराजी व्यक्त केली आहे.
या शोमध्ये मॉडेल्सनी हलक्या -फुलक्या कॉटन कपड्यांबरोबर कोल्हापुरी चप्पल घालून रॅम्पवर वॉक केला. या ब्रँडने कोल्हापुरी चप्पलच्या डिझाईनमध्ये मूळ शैली जपून त्यात एक लक्झरी टच दिला. परिणामी, ही चप्पल फॅशनप्रेमींमध्ये प्रचंड लोकप्रिय ठरली. कोल्हापुरी चप्पलला मिळालेले जीआय मानांकन आणि आता प्राडाच्या मंचावरचं मान्यताप्राप्त स्थान या दोन्ही गोष्टींमुळे कोल्हापुरी चप्पलने जागतिक दर्जाचा मान पटकावला आहे. या सादरीकरणाने भारतीय कारागीरांचे कौशल्य आणि वारशाला आंतरराष्ट्रीय दाद मिळवून दिली आहे. अनेकांनी सोशल मीडियावर हे द़ृश्य अभिमानाने शेअर केलं, तर काहींनी या परंपरेला ग्लोबल फॅशनमध्ये स्थान दिल्याबद्दल त्या ब्रँडचे आभार मानले.