

कोल्हापूर : जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाकडून आरटीईअंतर्गत २५ टक्के प्रवेशासाठी शासनाकडून दिलेल्या निधीमध्ये ११ शाळांना ४० लाख रुपये जादा निधी गेल्याचे स्पष्ट झाले आहे. परंतु, ही चौकशी होण्यापूर्वीच हा निधी संबंधित शाळांकडून प्राथमिक शिक्षण विभागाने वसूल केला आहे. हा निधी शासनाकडे पुन्हा जमा करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे प्राथमिक शिक्षणाधिकारी मीना शेंडकर यांनी सांगितले.
जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाकडून आरटीई प्रवेशाच्या चाळीस लाखांच्या निधीचे जादा वाटप काही शाळांना झाल्याने यासंदर्भात चौकशी समिती नेमली होती. तथापि, या चौकशी समितीचा अहवाल राज्याच्या शिक्षण संचालकांकडे सादर झाला आहे. दरम्यान, यासंदर्भात जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी मीना शेंडकर यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी चौकशी होण्यापूर्वी ही माहिती आमच्या निदर्शनास येताच आम्ही शाळांना जादाची गेलेली रक्कम वसूल केली आहे. ही रक्कम थेट शाळांच्या नावाने आल्यामुळे ती जादा स्वरूपात शाळांना गेली. परंतु, ही रक्कम आम्ही शाळांकडून वसूल केली असून, आता ती शासनाकडे परत करण्याची प्रक्रिया सुरू आहे.