Kolhapur ZP Election : आमदार राहुल आवाडे यांच्या कन्येला भाजपकडून जिल्हा परिषदेचे तिकीट, 'कोरोची' मतदारसंघातून उमेदवारी
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणातील अत्यंत महत्त्वाचे आणि वजनदार घराणे म्हणून ओळखल्या जाणाऱ्या 'आवाडे' घराण्यातील चौथी पिढी आता निवडणूक रिंगणात उतरली आहे. इचलकरंजीचे भाजप आमदार राहुल आवाडे यांच्या कन्या सानिका आवाडे यांना भाजपने जिल्हा परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर केली आहे. त्या 'कोरोची' जिल्हा परिषद मतदारसंघातून नशीब आजमावणार आहेत.
कोरोची मतदारसंघातून भाजपकडून तिकीट
माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे, माजी आमदार प्रकाश आवाडे आणि त्यानंतर विद्यमान आमदार राहुल आवाडे यांच्यानंतर सानिका आवाडे यांच्या रूपाने या कुटुंबातील चौथी पिढी थेट निवडणुकीच्या मैदानात उतरली आहे. हातकणंगले तालुक्यातील 'कोरोची' हा जिल्हा परिषद मतदारसंघ राजकीयदृष्ट्या अत्यंत संवेदनशील आणि महत्त्वाचा मानला जातो. या मतदारसंघात आवाडे गटाचे मोठे वर्चस्व असून, भाजपने सानिका आवाडे यांना संधी देऊन या जागेवर आपला विजय निश्चित करण्यासाठी जोरदार प्रयत्न केला आहे.
युवा नेतृत्वाचा राजकारणात उदय
उच्चशिक्षित आणि तरुण चेहरा असलेल्या सानिका आवाडे यांच्या उमेदवारीमुळे कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत नवी चुरस निर्माण झाली आहे. परिणामी विरोधकांसमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे. आवाडे घराण्यातील चौथ्या पिढीला कोरोची मतदारसंघातील जनता कौल देणार का? आणि सानिका आवाडे या आपल्या घराण्याचा राजकीय वारसा कशाप्रकारे पुढे नेणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

