कोल्हापूर : जिल्हा परिषदेच्या निवडणूक ड्यूटीवर असणार्या कर्मचार्यांची पोस्टल मतदानाची सुविधा केली आहे. पोस्टल मतदानाला शनिवारपासून सुरुवात झाली. विवेकानंद कॉलेज येथे करवीर तहसील कार्यालयांतर्गत निवडणूक ड्यूटीवरील कर्मचार्यांसाठी दोन केंद्रांवर बॅलेट पेपरवर शिक्के मारून मतदानाची प्रक्रिया पार पडली. दिवसभरात 217 कर्मचार्यांनी पोस्टल मतदान केले.
जिल्हा परिषदेसाठी 7 फेब्रुवारी रोजी मतदान आहे. मतदानवेळी ड्यूटीवर असणार्यांपैकी जिल्हा परिषदेचे मतदार असणार्या कर्मचार्यांसाठी निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार पोस्टल मतदान घेतले जात आहे. जिल्हा परिषदेसाठी आतापर्यंत सुमारे 6,700 कर्मचार्यांनी पोस्टल मतदानासाठी अर्ज केले आहेत. अजून अर्ज दाखल होत आहेत. यामध्ये पोलिस कर्मचार्यांसह अन्य अधिकार्यांचाही समावेश आहे. करवीर तालुक्यातील मतदारसंघातील मतदान केंद्रावर असणार्या कर्मचार्यांचे विवेकानंद कॉलेज येथील हॉलमध्ये प्रशिक्षण झाले. याच ठिकाणी पोस्टल मतदानाला सुरुवात झाली. दोन केंद्रावर पोस्टल मतदानाची सुविधा केली होती. प्रशिक्षण झाल्यानंतर या केंद्रावर मतदानासाठी कर्मचार्यांनी रांगा लावल्या होत्या.
एकाचवेळी निवडणूक ड्यूटीवरील सर्व कर्मचार्यांचे प्रशिक्षण आणि सर्व पोस्टल मतदान होणार नसल्याने टप्प्याटप्प्याने याचे नियोजन केले आहे. रविवारी सायबर कॉलेज येथील हॉलमध्ये प्रशिक्षण व पोस्टल मतदान आहे. सोमवारी (दि. 2) रमणमळा येथील बहुउद्देशीय हॉलमध्ये पोस्टल मतदान होणार आहे. याच ठिकाणी 6 फेब्रुवारीपर्यंत पोस्टल मतदानाची सुविधा केली आहे.