

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात कायमस्वरूपी नोकरीच्या अमिषाने चार तरुणांना 42 लाख 80 हजार 500 रुपयांचा गंडा घातल्याप्रकरणी जुना राजवाडा पोलिस ठाण्यात शनिवारी सायंकाळी फुलेवाडी येथील दोघा भामट्यांविरुद्ध गुन्हा दाखल झाला. राजेंद्र मनोहर पाटील (70) व राजू दत्तात्रय सरनाईक (रा. पाचवा बस थांबा, फुलेवाडी, कोल्हापूर) अशी त्यांची नावे आहेत. संशयितांना रात्री उशिरापर्यंत अटक झाली नव्हती.
एप्रिल 2014 पासून आजअखेर संशयित पाटील, सरनाईक यांच्या घरी नवीन वाशी नाका तसेच फुलेवाडी रिंग रोड परिसरात हा प्रकार घडला. संजय वसंतराव सनगर (रा. फुलेवाडी) यांच्यासह श्रीकांत सनगर (रा. परिते ता. करवीर), एकनाथ ज्ञानू गडकर (रा. सडोली दुमाला, ता. करवीर), प्रकाश भडंगकर (रा. राधानगरी) यांनी जुना राजवाडा पोलिस ठाण्यात धाव घेऊन संशयिताविरुद्ध फिर्याद दाखल केली. संशयितांनी संजय सनगर यांचा मुलगा निलेश सनगर यास जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात नोकरी लावण्याचे आमिष दाखवून त्याच्याकडून वेळोवेळी 10 लाख 50 हजार रुपये, श्रीकांत सनगर याच्याकडून 10 लाख 60 हजार, एकनाथ ज्ञानू गडकरकडून 13 लाख 54 हजार तर प्रकाश भडंगकर यांच्याकडून 8 लाख 70 हजार रुपये उकळल्याचे पोलिस निरीक्षक किरण लोंढे यांनी सांगितले.
संशयित राजेंद्र पाटीलसह साथीदार राजू सरनाईक याने चारही उमेदवारांना कोल्हापूर जिल्हा परिषदेत आरोग्य विभागातील नियुक्तीची बनावट ऑर्डर दिल्याचा धक्कादायक प्रकारही चव्हाट्यावर आला आहे. जिल्हा परिषदेसह मुंबईत मंत्रालयात वरिष्ठाधिकारी आपल्या विश्वासातील व ओळखीचे आहेत, त्यांच्यामार्फत उमेदवारांना जिल्हा परिषद तसेच शासकीय कार्यालयात कायमस्वरूपी नोकरी मिळवून देण्याचा बहाणा करून संशयितांनी बेरोजगार तरुणांना गंडा घातल्याचा प्रकार उघडकीला आल्याचे पोलिस निरीक्षक लोंढे यांनी सांगितले. संशयितांकडून नोकरीच्या आमिषाने फसगत झाली असल्यास संबंधितांनी जुना राजवाडा पोलिस ठाण्यांशी संपर्क साधावा, असे आवाहनही पोलिस निरीक्षकांनी केले आहे. फिर्याद दाखल केलेल्या चौघा उमेदवारांशिवाय आणखी काही तक्रारी दाखल होण्याची शक्यता असल्याचेही त्यांनी सांगितले. संशयितांना रात्री उशिरापर्यंत अटक झाली नव्हती. लवकरच त्यांना अटक करण्यात येईल, असेही लोंढे यांनी सांगितले.