

कोल्हापूर : जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीच्या वतीने एकमत झालेल्या जागांवरील उमेदवारांची यादी बुधवारी रात्री जाहीर केली. महाविकास आघाडीमध्ये सर्वाधिक 38 जागा काँग्रेसला मिळाल्या. याशिवाय शिवशाहू आघाडी 4, ठाकरे शिवसेना 6, स्वाभिमानी शेतकरी संघटनेला 5 जागा वाट्याला आल्या आहेत. याशिवाय दोन अपक्ष उमेदवारांना महाविकास आघाडीने पुरस्कृत केले आहे. यामध्ये सात माजी सदस्यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे.
जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीच्या वतीने गेल्या काही दिवसांपासून जागा वाटपाबाबत चर्चा सुरू होती. महाविकास आघाडीच्या वतीने काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील आघाडीतील घटक पक्षाच्या प्रमुख पदाधिकार्यांशी चर्चा करत होते. याशिवाय स्थानिकची परिस्थिती लक्षात घेऊन काही तालुक्यांतील स्थानिक नेत्यांशी चर्चा करून त्यांनाही महाविकास आघाडीसोबत घेण्यात यश मिळविले आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने महाविकास आघाडीसोबत राहण्याचे ठरविले आहे.
महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपाच्या चर्चेत काँग्रेस व शिवसेना तसेच काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाशी काही जागांबाबत एकमत होऊ शकले नाही. शिवसेनेने करवीर तालुक्यातील जवळपास पाच ते सहा जागांवर आग्रह धरला होता; परंतु काँग्रेसचे नेते आमदार पाटील यांनी त्यांना हे मतदारसंघ काँग्रेसचे पारंपरिक मतदारसंघ आहे, काँग्रेसची या ठिकाणी ताकद आहे. त्यामुळे जागांवर आग्रह धरू नका, असे सांगितले; परंतु ठाकरे शिवसेनेच्या जिल्ह्यातील पदाधिकार्यांनी आपला आग्रह कायम ठेवल्याने अशा मतदारसंघात मैत्रीपूर्ण लढती करण्याचे ठरले.
शाहूवाडी : विजय खोत, (शित्तूर तर्फ वारुण), अमर हंबीरराव पाटील, (सरूड), हेमा बारस्कर (आंबार्डे) सर्व ठाकरे शिवसेना. पन्हाळा : अमर यशवंत पाटील-अपक्ष (कोडोली), विलास चेचर, (पार्ले तर्फ ठाणे), त्रिवेणी दादासो पाटील, (यवलूज), सुजाता वसंत पाटील, (कळे) सर्व काँग्रेस. हातकणंगले : शुभांगी महेश कुंभार, (घुणकी), सोनाली राहुल सावंत (भादोले), अलका अशोक कांबळे (आळते), रोहन आवळे (रुकडी), राहुल राजू आवळे (रुई), लखन कांबळे (कबनूर), अभिषेक पाटील (रेंदाळ) सर्व काँग्रेस, अलका कागवाडे (कुंभोज), दीपाली कोराणे (कोरोची) दोघे स्वाभिमानी (कुंभोज), शशिकांत खवरे, अपक्ष (शिरोली), रोहित जाधव, ठाकरे शिवसेना (पट्टणकोडोली), शिरोळ : नंदिनी कांबळे (दानोळी) महादेवी कोळी (नांदणी), जयश्री आवळे किंवा स्वाती मधाळे (अब्दुललाट), स्वाभिमानी शेतकरी संघटना, सागर पुजारी, ठाकरे शिवसेना (उदगाव). दीपाली पाटील किंवा सुरेखा पाटील (दत्तवाड), आय.आय. पटेल किंवा फहीम पटेल (आलास), अर्चना चौगले (यड्राव) सर्व काँग्रेस.
कागल : रूपाली दिनकर आवळे (कसबा सांगाव), राजश्री पाटील (कापशी) दोन्ही काँग्रेस.
करवीर : विश्वनाथ पाटील (शिये), रामकृष्ण पाटील (वडणगे), किर्तीकुमार मसुटे (उचगाव), रावसाहेब पाटील (मुडशिंगी), सुदर्शन खोत (गोकुळ शिरगाव), संग्राम पाटील (पाचगाव), मनीषा पाटील (कळंबे तर्फ ठाणे), के. एन. पाटील (पाडळी खुर्द), रसिका पाटील (शिंगणापूर), शीतल यादव (सांगरूळ), रवींद्र पाटील (सडोली खालसा), एकनाथ पाटील (निगवे खालसा) सर्व काँग्रेस. गगनबावडा : सोनाली पाटील (तिसंगी) व संभाजी पाटणकर (आसळज) दोन्ही काँग्रेस. राधानगरी : सागर धुंदरे (राशिवडे ब—ुदूक), भाग्यश्री डोंगळे (कसबा तारळे), सुधीर चौगले (कसबा वाळवे), संयोगिता मोरे (सरवडे), अभिजित तायशेटे (राधानगरी) सर्व काँग्रेस. भुदरगड : रेश्मा देसाई (गारगोटी), मेघा देसाई (पिंपळगाव), उज्ज्वला देसाई (आकुर्डे), शुभांगी जाधव (कडगाव) सर्व शिवशाहू विकास आघाडी. गडहिंग्लज : रियाजभाई शमनजी ठाकरे शिवसेना (हलकर्णी), अॅड. दिग्विजय कुराडे (गिजवणे), विद्याधर गुरंबे (नेसरी) दोघेही काँग्रेस. चंदगड : शीतल देसाई (आडकूर), सुजाता पाटील (कुदनूर) दोन्ही काँग्रेस. महाविकास आघाडीच्या वतीने जिल्हा परिषद उमेदवारांची यादी सायंकाळी जाहीर केली. त्यानंतर पंचायत समितीच्या उमेदवारांचीही यादी रात्री उशिरा प्रसिद्ध केली.
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या पदाधिकार्यांची सून काँग्रेसच्या चिन्हावर करवीर तालुक्यातील जिल्हा परिषद मतदारसंघातून निवडणूक लढवित आहे.
जिल्हा परिषदेचे सात माजी सदस्य पुन्हा रिंगणात
माजी शिक्षण समिती सभापती रसिका पाटील यांच्यासह जिल्हा परिषदेचे सात माजी सदस्य महाविकास आघाडीकडून पुन्हा निवडणूक रिंगणात उतरले.