राष्ट्रवादीची मुसंडी; काँग्रेस दुसऱ्या स्थानी; राष्ट्रवादी, भाजप, शिवसेना महायुती 48 तर काँग्रेस महाविकास 17 जागी विजयी
कोल्हापूर : जिल्हा परिषद निवडणुकीत सर्वाधिक 18 जागा जिंकत राष्ट्रवादी काँग्रेसने जोरदार मुसंडी मारली. महापालिका निवडणुकीप्रमाणेच काँग्रेसने एकट्याने झुंज दिली. मात्र, काँग्रेस 15 जागांसह दुसर्या स्थानावर राहिला. भाजपला 12 जागांसह तिसर्या स्थानावर समाधान मानावे लागले. शिवसेनेने 9 जागांवर यश मिळवले. महायुतीचेच घटक असलेल्या जनसुराज्यने 5, राजेंद्र पाटील-यड्रावकर गटाने 4 जागा मिळवल्या. स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटाला प्रत्येकी एक जागा मिळाली, तर एका अपक्षासह तीन जागांवर स्थानिक आघाड्यांचा झेंडा फडकला. महायुतीचे एकत्रित संख्याबळ 48 पोहोचले असून महाविकास आघाडी 17 जागांवर थांबली आहे.
कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालेले नाही. सत्तेसाठीची 35 जागांची मॅजिक फिगर गाठण्यासाठी महायुतीचे घटक पक्ष एकत्र येतील, अशीच दाट शक्यता आहे. यामुळे जिल्हा परिषदेवर महायुतीचीच सत्ता येईल, असे चित्र आहे. जिल्हा परिषदेच्या एकूण 68 जागांसाठी 241 तर पंचायत समितीच्या 136 जागांसाठी 455 अशा एकूण 696 उमेदवारांचे नशीब शनिवारी (दि. 7) ईव्हीएममध्ये बंद झाले होते. जिल्ह्यातील 12 तालुक्यांतील 23 लाख 40 हजार 199 मतदारांपैकी 17 लाख 40 हजार 7 मतदारांनी केलेल्या मतदानाची सोमवारी (दि. 9) मोजणी झाली. तालुकानिहाय निश्चित केलेल्या मतमोजणी केंद्रांवर सकाळी दहा वाजता मतमोजणीला प्रारंभ झाला. टपाली आणि ईव्हीएमवरील मतमोजणी एकाच वेळी सुरू करण्यात आली. मतमोजणीसाठी सकाळपासूनच उमेदवारांच्या प्रतिनिधींसह कार्यकर्त्यांची गर्दी झाली होती. ओळखपत्र असणार्यांनाच मतमोजणी केंद्रात प्रवेश दिला जात होता. कार्यकर्त्यांना थांबण्यासाठी निश्चित केलेल्या जागेवर सकाळपासून निकालाच्या प्रतीक्षेत असलेल्या कार्यकर्त्यांत उत्सुकता होती. निकाल जाहीर होत गेले, तसतसे विजयी उमेदवारांच्या कार्यकर्त्यांत जल्लोषाचे तर पराभूत उमेदवारांच्या कार्यकर्त्यांत निराशेचे वातावरण होत होते.
जिल्ह्यातील 68 मतदारसंघांपैकी तब्बल 18 ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसने झेंडा फडकावला. ऐन निवडणुकीत चुरशीचा प्रचार सुरू असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निधन झाले. या धक्क्यामुळे जिल्ह्यातील पक्षनेते व कार्यकर्त्यांची पायाखालची वाळू सरकली होती. दोन-तीन दिवस प्रचार पूर्णतः ठप्प होता. मात्र प्रतिकूल परिस्थितीतून सावरत राष्ट्रवादी काँग्रेसने जोरदार मुसंडी मारली. घड्याळ चिन्हावर सहानुभूतीच्या लाटेवर तब्बल 18 जागा जिंकल्या. कागल तालुक्यात झालेल्या एकतर्फी निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपचे सर्व उमेदवार विजयी झाले. कागलमध्ये शिवसेनेला बाजूला ठेवत हसन मुश्रीफ, समरजित घाटगे व संजय घाटगे एकत्र आले होते. या तालुक्यात माजी खासदार संजय मंडलिक यांना पंचायत समितीची केवळ एक जागा मिळाली. जिल्हा परिषदेत मात्र खाते उघडता आले नाही. महायुतीच्या विरोधात एकटे लढणारे काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी गगनबावड्यातील दोन्ही उमेदवार निवडून आणत आपला गड कायम राखला. तिसंगी गटात जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष पी. जी. शिंदे यांच्या भावजय कल्पना शिंदे यांना पराभवाला सामोर जावे लागले.
आजरा तालुक्यातील दोन्ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसने जिंकल्या आहेत. उत्तूर गटात जिल्हा परिषद अध्यक्ष उमेश आपटे यांना पराभवाचा धक्का सहन करावा लागला. ते यावेळी ताराराणी आघाडीकडून निवडणूक रिंगणात उतरले होते. शाहूवाडीमध्ये 4 जागा असून दोन जागा जनसुराज्य शक्ती, शिवसेना ठाकरे व राष्ट्रवादीला प्रत्येकी 1 जागा मिळाली. राधानगरी तालुक्यात 5 जागा असून काँग्रेसला 3 आणि राष्ट्रवादी व शिवसेनेला प्रत्येकी 1 जागा मिळाली आहे. भुदरगड तालुक्यात पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी आपला गड राखला आहे. या तालुक्यातील 4 पैकी 3 जागा शिवसेनेला व शिवशाहू आघाडीला एक जागा मिळाली. पालकमंत्री यांच्या भावजय विजयी झाल्या. चंदगडमध्ये 4 जागा असून 3 जागा राष्ट्रवादीने पटकावल्या तर भाजपला केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले. करवीर तालुक्यात काँग्रेसने आपले वर्चस्व पुन्हा सिद्ध केले असून शिवसेनेला मोठा फटका बसला आहे. शिवसेनेला केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले. करवीरमधील 12 जागांपैकी काँग्रेसने 5 जागा पटकावल्या. राष्ट्रवादी व भाजपला प्रत्येकी 3 जागा मिळाल्या आहेत. गडहिंग्लजमधील 5 पैकी 4 जागा राष्ट्रवादीने तर जनसुराज्य शक्ती पक्षाला 1 जागा मिळाली. या तालुक्यात काँग्रेस, भाजपला एकही जागा मिळाली नाही. पन्हाळा तालुक्यात आमदार विनय कोरे यांना यावेळी चांगलाच धक्का बसला आहे. तालुक्यातील 6 जागांपैकी जनसुराज्य शक्ती पक्षाला केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले. या तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसने मुसंडी मारत 3 जागा व ठाकरे शिवसेनेला 1 जागा मिळाली.
शिरोळ तालुक्यातील 7 जागांपैकी यड्रावकर यांच्या शाहू विकास आघाडीला 3, काँग्रेसला 2 आणि भाजप व शिवसेनेला प्रत्येकी 1 जागा मिळाली. जिल्ह्याच्या सत्ताकारणावर परिणाम घडविणार्या तालुक्यांपैकी हातकणंगले तालुका आहे. या तालुक्यात 11 गट आहेत. यामध्ये भाजपला 4, काँग्रेसला 3, शिवसेनेला 3 व जनसुराज्य शक्ती पक्षाला 1 जागा मिळाली.
राष्ट्रवादीचा झंझावात
जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीत जागा वाटपाबाबत महायुतीच्या नेत्यांच्या बैठकीत एकमत न झाल्याने स्वतंत्र लढण्याचे ठरविण्यात आले. परंतु हा निर्णय घेत असताना ज्या ठिकाणी शक्य आहे त्याठिकाणी महायुती म्हणून एकत्र लढण्याचे धोरण मान्य करण्यात आले. या संधीचा लाभ राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांनी घेतला. राजकारणातील चार-पाच दशकांचा अनुभव असलेले मुश्रीफ यांनी तालुकानिहाय स्थानिक परिस्थिती पाहून सोयीच्या आघाड्या करण्यास सुरुवात केली. याची सुरुवात त्यांनी आपल्या होमपीच कागलमधूनच केली. कागलमध्ये त्यांनी महायुतीमधील प्रमुख घटक पक्ष असलेल्या शिवसेनेलाच आपल्यापासून लांब ठेवले. त्यांनी कागलमध्ये भाजपसोबत आघाडी करत राष्ट्रवादीच्या वाट्याला आलेल्या सर्व जागा निवडून आणल्या. चंदगड, आजरा, गडहिंग्लज इकडे वेगळीच आघाडी केली. गडहिंग्लज, चंदगडमध्ये त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाबरोबर युती केली आणि या तालुक्यातही त्यांना चांगले यश मिळाले. पन्हाळा, शाहूवाडी तालुक्यात राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर, मानसिंग गायकवाड यांची मुश्रीफ यांना चांगली साथ मिळाली. गेल्या निवडणुकीत या दोन तालुक्यातून राष्ट्रवादीच्या दोन जागा निवडून आल्या होत्या. यावेळी चार जागा निवडून आल्या आहेत.
काँग्रेसची झुंज
जिल्ह्यात महायुतीच्या नेत्यांच्या विरोधात विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील एकटे लढले. महापालिकेबरोबरच जिल्हा परिषदेतही त्यांना चांगले यश मिळाले. 15 जागा जिंकून काँग्रेस दुसर्या क्रमांवर आली आहे. याशिवाय स्थानिक पातळीवर विविध आघाड्यांच्या माध्यमातून काही जागा मिळवत काँग्रेसने आपली ताकद कायम असल्याचे दाखवून दिले.
भाजपने दोन जागा गमावल्या
दुसरीकडे नगरपालिका व महानगरपालिकांमध्ये यशाची परंपरा राखणार्या भाजपला जिल्हा परिषदेत अपेक्षित कामगिरी करता आली नाही. गेल्या निवडणुकीत मिळालेल्या 14 इतक्या जागाही त्यांना राखता आल्या नाहीत. 12 जागांवर त्यांना समाधान मानावे लागले.
शिवेसेनेचा 9 जागांवर विजय
महायुतीचा प्रमुख घटक पक्ष असलेल्या शिवसेनेला 9 जागा मिळाल्या. नऊ जागांसह शिवसेना चौथ्या क्रमांकाचा पक्ष ठरला.
जनसुराज्यला पाच जागा
जनसुराज्य शक्ती पक्षाची अशीच अवस्था झाली. जनसुराज्य शक्ती पक्षाला 5 जागा मिळाल्या. आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या आघाडीला 4 जागा मिळाल्या आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटाने प्रत्येकी एक जागा मिळवून आपले अस्तित्व राखले.
भावजयीचा पराभव करत नणंद सभागृहात
कसबा तारळे (राधानगरी) जि.प. मतदारसंघातून अमृता अरुण डोंगळे व भाग्यश्री धीरज डोंगळे या नणंद-भावजयीमध्ये लढत होती. यामध्ये अमृताने आपली भावजयी भाग्यश्री डोंगळे यांचा पराभव केल्याने त्यांचा जिल्हा परिषद सभागृहात जाण्याचा मार्ग मोकळा झाला.

