

कुरुंदवाड : पुढारी वृत्तसेवा : नृसिंहवाडी (ता. शिरोळ) येथे देवदर्शनासाठी आलेल्या एकाचा पाण्यात बुडून दुर्दैवी अंत झाला. नरेंद्र कोरवी (वय.३९, रा.कोरवी गल्ली, कुरुंदवाड) असे मृताचे नाव आहे. ही घटना सोमवारी (दि.१४) दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास घडली. वजीर रेस्क्यू फोर्सचे रौफ पटेल, नावाडी अक्षय शिंदे व रेस्क्यू फोर्सच्या जवानांनी मृतदेह पाण्याबाहेर काढला. शिरोळ पोलिसांत या घटनेची नोंद झाली आहे. (Kolhapur News)
याबाबत अधिक माहिती अशी की, कुरुंदवाड येथील नरेंद्र कोरवी पत्नी व दोन मुलांसह नृसिंहवाडी येथे दर्शनासाठी आले होते. दर्शनानंतर कुटुंबीयांनी थोडावेळ विश्रांती घेत मुलांना घेऊन आंघोळीसाठी नदीत उतरले. या दरम्यान, पाण्याचा अंदाज न आल्याने संबंधित तरुण अचानक खोल पाण्यात गेला आणि बुडाला. उपस्थित लोकांनी आरडाओरड करत तत्काळ मदत मागितली. घटनेची माहिती मिळताच वजीर रेस्क्यू फोर्सचे रौफ पटेल, नावाडी अक्षय शिंदे व रेस्क्यू फोर्सच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली व तातडीने शोधमोहीम सुरू केली.
अवघ्या तासाभरात मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आला. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. मृत तरुण कुरुंदवाड शहरातील रहिवासी असून मोलमजुरी करून आपल्या कुटुंबाचा गाडा चालवत होता. त्याच्या मागे पत्नी व दोन लहान मुले असा परिवार आहे. त्याच्या आकस्मिक निधनाने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.