

विशाळगड : सध्या लग्नासाठी वधू शोधत असलेल्या अविवाहित तरुणांना लक्ष्य करून एक मोठे फसवणुकीचे रॅकेट शाहूवाडी तालुक्यात सक्रिय झाले आहे. हे रॅकेट चंद्रपूर जिल्ह्यातील असल्याचे समोर आले आहे. ‘माहेर अनाथ आश्रम, शाहूवाडी’ या नावाने चालवल्या जाणार्या या रॅकेटमध्ये तरुणांना सुंदर मुलींचे स्थळ दाखवण्याचे आमिष दाखवून त्यांच्याकडून पैसे उकळले जात आहेत. यामुळे अनेक तरुण फसवणुकीला बळी पडत आहेत.
या फसवणुकीच्या रॅकेटमध्ये महिलांचा सहभाग असून, त्या अविवाहित तरुणांशी फोनवर संपर्क साधतात. बोलता-बोलता त्या त्यांना व्हॉटस्अॅपवर आकर्षक मुलींचे फोटो पाठवतात. या फोटोंमुळे तरुण त्यांच्या जाळ्यात अडकतात. त्यानंतर लग्नासाठी मुलगी पाहण्याकरिता येण्याच्या नावाखाली तरुणांकडून प्रत्येकी 5 ते 6 हजार रुपयांची मागणी केली जाते. विशेष म्हणजे, या संपूर्ण प्रक्रियेत कोणताही प्रत्यक्ष संपर्क साधला जात नाही, सर्व व्यवहार केवळ व्हॉटस्अॅपवरच होतो.