

गुडाळ : राधानगरी राज्यमार्गावर आणाजे येथे धोकादायक खड्ड्यात मोटारसायकल आदळल्याने रस्त्यावर पडून रादिया मेहबूब बक्षू (वय ४३) ही महिला गंभीर जखमी झाली. दरम्यान, कोल्हापूरच्या खासगी इस्पितळात मृत्यूशी झुंज देत असलेल्या या महिलेची प्रकृती चिंताजनक बनली असून, राधानगरी राज्यमार्गावरील खड्डे भरण्याकडे दुर्लक्ष केलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हलगर्जीपणाबाबत परिसरात तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.
(दि. २४) सायंकाळी भोगावती येथे काम आटोपून कसबा तारळे येथील मेहबूब बक्षू दुचाकीवरून पत्नीसह गावी परतत होते. अचानक खड्ड्याचा अंदाज न आल्याने दुचाकी खड्ड्यात आपटल्याने मागे बसलेल्या रादिया दुचाकीवरून उडून थेट रस्त्यावर आपटल्या. त्यांच्या डोक्याला गंभीर ईजा झाल्याने तातडीने प्रथम भोगावती येथे प्राथमिक उपचार करून कोल्हापुरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.