कोल्हापूर : आरोग्य क्षेत्रातील आमूलाग्र गोष्टींमुळे कोल्हापूर बदलत आहे. त्याचप्रमाणे सीपीआरमध्ये बदल होत असून अनेक दर्जेदार सोयी-सुविधा रुग्णांना मिळत आहेत. आगामी काळात कोल्हापूरची मेडिकल हब म्हणून ओळख निर्माण होईल, असा विश्वास पालकमंत्री तथा सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी व्यक्त केला.
शेंडा पार्कमधील राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अकराशे बेडच्या पहिल्या स्लॅब व सीपीआर येथील अद्ययावत अपघात, अतिदक्षता, डायलेसिस, क्ष-किरण यंत्रणा, आयुष्मान भारत डिजिटल मिशन एकत्रित फिरता दवाखाना व पॅथॉलॉजिकल लॅबोरेटरी लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ होते.
पालकमंत्री आबिटकर म्हणाले, शेंडा पार्क येथे होणार्या रुग्णालयाचा फायदा जिल्ह्यातील रुग्णांना होणार आहे. तामिळनाडूमध्ये जनआरोग्य योजनेचे सर्वाधिक 55 टक्के पैसे शासकीय रुग्णालयावर खर्च केले जातात. महाराष्ट्रात ते प्रमाण 10 ते 12 टक्के आहे. त्यासाठी अजून प्रचंड काम करण्याची गरज आहे.
मंत्री मुश्रीफ म्हणाले, राज्यात नवीन 15 वैद्यकीय महाविद्यालये सुरू केली आहेत. राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्राध्यापक, सहायक प्राध्यापकांची पदे एमपीएसीमधून भरली जातील. लाडकी बहीण योजनेमुळे निधीसाठी थोडी अडचण झाली तरीही अन्य बँकांकडून पैसे घेऊन अडचणीतून मार्ग काढून कामे सुरू आहेत. कोल्हापूर दोन वर्षात मेडिकल हब बनेल. ‘वैद्यकीय शिक्षण’चे सचिव धीरज कुमार यांनी मनोगत व्यक्त केले. अधिष्ठाता डॉ. एस. एस. मोरे यांनी स्वागत केले. वैद्यकीय शिक्षणचे आयुक्त अनिल भंडारी यांनी प्रास्ताविक केले.
सूत्रसंचालन विवेक गवळी यांनी केले. डॉ. शिशिर मिरगुंडे यांनी आभार मानले. यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुप्रिया देशमुख, वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजेंद्र मदने, गोकुळचे संचालक युवराज पाटील, जिल्हा बँकेचे संचालक भैया माने, डॉ. अजित लोकरे, डॉ. अपराजित वालावलकर, डॉ. गिरीश कांबळे आदी उपस्थित होते.
वैद्यकीय शिक्षण घेणार्या विद्यार्थ्यांना शेंडा पार्क येथे सर्व सोयी-सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. मार्च 2027 पर्यंत अकराशे बेडच्या रुग्णालयाचे काम पूर्ण होईल. त्यांच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आणणार असल्याचे मंत्री मुश्रीफ म्हणाले.
शासकीय रुग्णालयात दर्जेदार उपचार मिळाले पाहिजेत ही प्रत्येकाची अपेक्षा असते. पण त्या मिळाल्या नाही तर तो शब्द आमच्यावर येतो. सीपीआरमध्ये दहा डॉक्टर व दहा कर्मचारी कामचुकार आहेत. त्यांनी चांगल्या पद्धतीने काम करावे. मंत्री मुश्रीफ यांच्याकडे त्यांच्या नावाची यादी दिली आहे, त्यावर ते निर्णय घेतील, असे पालकमंत्री आबिटकर म्हणाले.