कोल्हापूर : गांधीनगरात कचरा निर्गतीचे नियोजन कधी?

कोल्हापूर : गांधीनगरात कचरा निर्गतीचे नियोजन कधी?

गांधीनगर; विश्वास शिंदे : चौकाचौकात साचून राहणारे कचर्‍याचे ढीग, त्यातच वावरणारी भटकी कुत्री आणि दुर्गंधीमुळे गांधीनगरवासीय हैराण झाले आहेत. कचरा निर्गतीच्या नियोजनाअभावी हा प्रश्न दिवसागणिक जटिल होत आहे.

सिंधी सेंट्रल पंचायत, भाजी मंडई, शिरू चौक, म्हसोबा माळ परिसर, जुने पोस्ट ऑफिस परिसरात कचर्‍याचे ढीग साचून राहतात. त्यातच भटक्या कुत्र्यांचा वावर असल्याने दुर्गंधीमुळे त्यात आणखी भर पडते. या दूषित वातावरणाचा ग्रामस्थांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. ताप, डेंग्यूसद़ृश आजाराचे रुग्ण वाढण्याची शक्यता आहे.

डासांच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे खासगी रुग्णालयासह शासकीय रुग्णालयात तापाचे रुग्ण आढळून येत आहेत. या पार्श्वभूमीवर कचरा निर्गत करण्याकडे ग्रामपंचायतीचे पूर्ण दुर्लक्ष झाले आहे.

कचरा वेळेवर उचलला जात नाही, त्यामुळे त्यातून दुर्गंधी सुटते. कचरा रोजच्या रोज निर्गत करण्याची जबाबदारी ग्रामपंचायतीची असते. पण ती जबाबदारी पार पाडली जात नसल्याचे कचर्‍याच्या ढिगावरून स्पष्ट होत आहे.

जुने पोस्ट ऑफिस, डॉ. पुरोहित दवाखाना परिसर, साईबाबा मंदिर परिसर, वीज कार्यालय रस्ता, गांधी पुतळा बगिचा परिसर आदी ठिकाणी कचर्‍याचे ढीग आहेत. बर्‍याच वेळा ग्रामपंचायतीकडे ग्रामस्थ तक्रारी करतात; पण रोजचे रडगाणे कायम आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news