

कोल्हापूर : गेल्या काही दिवसांपासून उन्हाच्या चटक्याने हैराण झालेल्या कोल्हापूरकरांना आगामी काळात निसर्गाच्या दुहेरी रूपाचा सामना करावा लागणार आहे. अरबी समुद्रावरील बदलत्या हवामान स्थितीमुळे आणि उत्तरेकडून येणाऱ्या पश्चिमी विक्षोभामुळे कोल्हापूरसह दक्षिण महाराष्ट्रात मान्सूनपूर्व पावसासाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे. परिणामी बुधवार (दि. 25) ते शुक्रवार (दि. 27) पर्यंत जिल्ह्याच्या विविध भागांत मेघगर्जनेसह विखुरलेल्या स्वरूपात पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता हवामान तज्ञांनी वर्तवली आहे.
दक्षिण महाराष्ट्रात निर्माण झालेल्या हवेच्या कमी दाबामुळे बाष्पाचे प्रमाण वाढले असून याचा सर्वाधिक परिणाम कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यांवर दिसून येईल. बुधवारी आणि गुरुवारी दुपारनंतर वातावरणात मोठे बदल होऊन ढगांच्या गडगडाटासह पावसाची हजेरी लागेल. विशेषतः पश्चिम घाट आणि लगतच्या ग््राामीण भागात पावसाचा जोर अधिक राहण्याची शक्यता आहे. यामुळे उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला तरी विजांच्या कडकडाटावेळी नागरिकांनी खबरदारी घेण्याची गरज आहे. जिल्ह्याचे तापमान 36 ते 38 अंश सेल्सिअसच्या दरम्यान स्थिर राहणार आहे. पावसाळी वातावरणामुळे हवेत आर्द्रता वाढून उकाडा अधिक जाणवण्याची शक्यता आहे.