कोल्हापुरात जुलैमध्ये ‘हॉट नाईटस्‌’चा विक्रम

सलग तीन रात्री किमान तापमान २३ अंशांपुढे; पावसाच्या खंडामुळे उकाडा वाढला
Kolhapur Weather
Kolhapur Weatherfile
Published on
Updated on

कोल्हापूर : जुलै महिना म्हणजे मुसळधार पाऊस आणि गारवा, अशी सर्वसाधारण अपेक्षा असते. मात्र यंदा चित्र पूर्णपणे उलट दिसत आहे. पावसाने अचानक विश्रांती घेतल्याने शहरासह जिल्ह्यात दिवसा कडक ऊन पडत असून रात्रीही उष्णतेचा प्रभाव कायम राहात आहे. त्यामुळे ‘हॉट नाईटस्‌’ अर्थात उष्ण रात्रींच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. रविवार (१२ जुलै), सोमवार (१३ जुलै) आणि मंगळवार (१४ जुलै) या तिन्ही दिवशी किमान तापमान अनुक्रमे २३.२, २३.१ आणि २३.० अंश सेल्सिअस इतके नोंदवले गेले. भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या १९६९ पासूनच्या सर्वात उष्ण रात्रींच्या यादीत या तीन रात्रींचा समावेश झाला आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात १९६९ नंतरच्या सर्वाधिक उष्ण दहा रात्रींच्या यादीत अनुक्रमे आठव्या, नवव्या आणि दहाव्या क्रमांकावर या रात्रींची नोंद झाली आहे. जुलै महिन्यात सलग तीन दिवस किमान तापमान २३ अंशांच्या पुढे जाण्याची घटना दुर्मीळ मानली जाते. दिवसाचे कमाल तापमानही ३०.२ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले आहे. ढगाळ वातावरणामुळे सापेक्ष आर्द्रता ६७ ते ९४ टक्क्यांदरम्यान राहिली. हवेत मोठ्या प्रमाणात ओलावा असल्याने रात्री पृथ्वीचे तापमान कमी होण्याचा वेग मंदावतो. परिणामी रात्रभर उकाडा कायम राहून नागरिकांना अस्वस्थता जाणवत आहे.

पंचगंगा ११.१० फुटांवर; सर्व बंधारे खुले

मंगळवारी जिल्ह्यात बहुतांश भागात पावसाने पूर्णपणे दडी मारली. पन्हाळा आणि भुदरगड तालुक्यात हलक्या सरी वगळता इतर कोणत्याही तालुक्यात पावसाची नोंद झाली नाही. जिल्ह्यातील १७ प्रमुख धरण क्षेत्रांमध्येही पाऊस झालेला नाही. मान्सूनच्या विश्रांतीचा परिणाम स्पष्टपणे दिसून आला. पंचगंगा नदीची पाणीपातळी ११ फूट १० इंच इतकी असून इचलकरंजी बंधारा रात्री खुला झाला. यामुळे आतापर्यंत पाण्याखाली गेलेले सर्व बंधारे खुले झाले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news