

कोल्हापूर : काळम्मावाडी येथील थेट पाईपलाईनच्या बंद पडलेल्या पंप दुरुस्तीचे काम शनिवारी रात्री उशिरा पूर्ण झाल्यामुळे शहराचा पाणी पुरवठा सुरळीत झाला आहे.
गेल्या आठ दिवसांपासून शहरवासीयांना ऐन सणात पाणी टंचाईला तोंड द्यावे लागले. मंगळवारी पंप दुरुस्त झाला. परंतु टेस्टिंगवेळी तो पुन्हा बंद पडल्याने त्याचे पार्ट मिळविण्यासाठी महापालिकेला धावाधाव करावी लागली होती. प्रशासक के. मंजुलक्ष्मी यांनी पुणे महानगरपालिकेशी संपर्क साधून हा पार्ट आणला, तज्ज्ञही बोलाविण्यात आले. त्यानंतर पंप दुरुस्तीचे काम पूर्ण झाले. दरम्यानच्या काळात नागरिकांना टँकरमधून पाणी पुरवठा करण्यात आला. त्यासाठी भाड्याने टँकर घेत महापालिकेने नियोजन केले. त्याचबरोबर शिंगणापूर योजना सुरू करण्यासाठी प्रशासक के. मंजुलक्ष्मी यांनी पुढाकार घेतला. त्यांच्या मार्गदर्शनाखाली जल अभियंता हर्षजित घाटगे आपल्या कर्मचार्यांसोबत दिवस-रात्र परिश्रम घेत होते.