

कोल्हापूर : विघ्नहर्त्या गणरायाच्या आगमनाच्या दिवशीच, बुधवारी कोल्हापूरकरांवर पाण्यासाठी धावाधाव करावी लागली. दुरुस्त केलेला पंप पुन्हा पहाटे बंद पडल्यामुळे नागरिकांना पाणीटंचाईला तोंड द्यावे लागले. महानगरपालिकेने पर्यायी व्यवस्था म्हणून टँकरने पाणीपुरवठा केला. टँकरवर गर्दी झाली होती. काही ठिकाणी टँकरची पळवापळवी झाल्याने नागरिकांतून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत होत्या.
दरम्यान, पंप दुरुस्तीसाठी लागणारी अत्याधुनिक क्रोबार असेंबली किट कंपनीकडे उपलब्ध नसल्यामुळे पुणे महापालिकेकडून मागविण्यात आले. लवकरच हे काम पूर्ण होईल, असे प्रशासक के. मंजुलक्ष्मी यांनी सांगितले. टँकरच्या नियोजनाची त्यांनी शहरात फिरून पाहणी केली.
काळम्मावाडी येथील एका पंपाचा व्हीएफडी कार्ड सोमवारी (दि. 25) मध्यरात्री अचनाक खराब झाल्याने शहरात अपुरा व कमी दाबाने पाणीपुरवठा झाला. पंप दुरुस्तीचे काम तातडीने रात्रीपासून युद्धपातळीवर सुरू करण्यात आले. रात्री काम पूर्ण झाल्यानंतर चाचणीदेखील घेतली. त्यामुळे बुधवारपासून पाणीपुरवठा सुरळीत होईल, असे महापालिकेने सांगितले होते. परंतु, तिसर्या टेस्टिंगनंतर पहाटे 4 वाजून 50 मिनिटांनी पुन्हा एरर आल्याने पाणीपुरवठा खंडित झाला. महापालिकेने पर्यायी व्यवस्था म्हणून वीस टँकरने पाणीपुरवठा केला. यासाठी 16 खासगी टँकर भाड्याने घेण्यात आले होते. शहरात जवळपास 70 ते 75 ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा केला.
पंप दुरुस्तीसाठी लागणार्या आवश्यक पार्टसह पुणे महापालिकेतील तंत्रज्ञही सायंकाळी सातच्या सुमारास कोल्हापुरात दाखल झाले. दुरुस्तीचे काम पूर्ण करून चाचणी घेतल्यानंतर पहाटेपर्यंत पाणीपुरवठा सुरळीत करण्याचा प्रयत्न होणार असल्याचे महापालिकेच्या वतीने सांगण्यात आले. उपायुक्त कपिल जगताप व जल अभियंता हर्षजित घाटगे घटनास्थळी उपस्थित राहून कामकाज पाहत आहेत.
ए वॉर्ड - राजेंद्र हुजरे : 9422576694, बी वॉर्ड - महानंदा सूर्यवंशी : 9423286600, सी व डी वॉर्ड - मयुरी पटवेकर : 9503402045, ई वॉर्ड - प्रिया पाटील : 9921513282, राजारामपुरी - सुनील भाईक : 9890122128, कळंबा फिल्टर हाऊस - गणेश लोखंडे : 9766360506.