

कोल्हापूर ः कोल्हापूर शहराला पाणीपुरवठा करणार्या विविध योजनांच्या पाईपलाईन गळतीचे ग्रहण काहीकेल्या सुटायला तयार नाही. एकीकडची गळती काढेपर्यंत दुसरीकडे गळती लागलेली असते. बालिंगा योजनेतील पाणी चंबुखडी येथे नेणार्या जलवाहिनीला चंबुखडीजवळ मोठी गळती आहे. गेली चार महिने या गळतीतून लाखो लिटर पाणी वाया गेले आहे. महाापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाला या गळतीची माहिती असूनही गळती काढण्याकडे दुर्लक्ष केले जात आहे.
महापालिकेच्या जलवाहिन्यांची गळती हा गंभीर विषय आहे. गेली 25 वर्षे हा विषय गाजत आहे. शिंगणापूर योजनेच्या गळतीने तर महापालिकेला हैराण केले होते. अजूनही जलवाहिन्यांना लागलेल्या गळतीचा विषय संपलेला नाही. ठिकठिकाणी गळती लागलेल्या आहेत. चंबुखडीजवळही एक गळती गेल्या चार महिन्यांपासून सुरू आहे. मुख्य जलवाहिनीतून असलेल्या या गळतीतून दररोज लाखो लिटर पाणी वाया जात आहे. महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाला कळवूनही याकडे दुर्लक्ष होत असल्याचे या परिसरातील नागरिक सांगत आहेत. त्यामुळे नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे.