

कोल्हापूर : कोल्हापूरकरांना पाणी पुरवणार्या दोन महत्त्वाच्या शासकीय कार्यालयांमध्ये शुक्रवारी थकबाकीच्या वसुलीवरून ‘पाणीयुद्ध’ पेटले. 165 कोटी रुपयांच्या पाणी बिलासाठी जलसंपदा विभागाने शहराचा पाणीपुरवठा उपसा पंप सील करून बंद केला, तर त्याला प्रत्युत्तर म्हणून महापालिकेने 10 कोटी रुपयांच्या थकलेल्या घरपट्टी आणि पाणीपट्टीच्या वसुलीसाठी थेट जलसंपदा विभागाचे कार्यालय सील करून ‘जशास तसे’ उत्तर दिले.
मनपावर ओढवली नामुष्की ; महापौरांच्या शिष्टाईने पंप पुन्हा सुरू
मार्च एंडिंगच्या पार्श्वभूमीवर थकबाकी वसुलीच्या मुद्द्यावरून जलसंपदा विभाग आणि महानगरपालिका यांच्यातील संघर्ष चिघळत शहराचा पाणीपुरवठा बंद करण्याची अभूतपूर्व कारवाई करण्यात आली. तब्बल 165 कोटी रुपयांच्या थकबाकी वसुलीसाठी शिंगणापूर, नागदेववाडी, बालिंगा येथील पंपिंग स्टेशन व काळम्मावाडी येथील पाणी उपसा केंद्र जलसंपदा विभागाने शुक्रवारी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास सील केले. महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच अशी नामुष्कीची वेळ आली. सणासुदीच्या तोंडावर पाणीपुरवठा खंडित झाल्याने संतापही व्यक्त करण्यात आला.
दरम्यान, महापौर रूपाराणी निकम यांनी तातडीने हस्तक्षेप करत दुपारी जलसंपदा विभाग व महापालिका अधिकार्यांची संयुक्त बैठक बोलावली. पाणीपुरवठा बंद ठेवणे योग्य नसल्याचे सांगत तो तत्काळ सुरू करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. मंत्री चंद्रकांत पाटील, खासदार धनंजय महाडिक यांच्या माध्यमातून जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्याशी संपर्क साधण्यात आला. यानंतर सायंकाळी सातच्या सुमारास पाणीपुरवठा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला. तब्बल सात तासांनंतर सील काढून उपसा केंद्रे सुरू करण्यात आली. मात्र, दिवसभर उपसा बंद राहिल्याने शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला. बुधवार, दि. 25 मार्चला पुन्हा थकबाकीसाठी बैठक होणार आहे.
महापालिकेमार्फत शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी काळम्मावाडी धरणासह शिंगणापूर, नागदेववाडी आणि बालिंगा येथून पंचगंगा नदीतून सुमारे 180 एमएलडी पाणी उपसा केला जातो. 2011 पासून महापालिकेकडे मोठ्या प्रमाणात थकबाकी प्रलंबित असल्याचा दावा जलसंपदा विभागाने केला आहे. वारंवार नोटीस देऊनही थकबाकी न भरल्याचा आरोपही विभागाकडून करण्यात आला आहे. जलसंपदा विभागाच्या आकडेवारीनुसार, महापालिकेकडे मूळ पाणीपट्टी 65.09 कोटी, दंड 58.97 कोटी, स्थानिक उपकर 13.13 कोटी आणि विलंब शुल्क 27.98 कोटी असा एकूण 165.18 कोटी रुपयांचा थकबाकीचा आकडा आहे. याबाबत पूर्वीच इशारे देण्यात आले होते. महापालिकेकडून केवळ एक-दोन कोटी रुपयांचा धनादेश देऊन तात्पुरती बोळवण केली जाते.
कारवाई-प्रतिकारवाईचा संघर्ष
शुक्रवारी सकाळी कार्यकारी अभियंता स्मिता माने व उपअभियंता मिलिंद किटवाडकर यांच्या पथकाने शिंगणापूर, नागदेववाडी व बालिंगा येथील पंपिंग स्टेशन सील केली. त्यानंतर काळम्मावाडी येथील पाणी उपसाही बंद केला. यावेळी जलअभियंता हर्षजित घाटगे व उपायुक्त शिल्पा दरेकर यांनी बालिंग्याजवळ उपस्थित राहून तोडगा काढण्याचा प्रयत्न केला. चर्चेदरम्यान दोन्ही विभागांमध्ये थकबाकीवरून शाब्दिक चकमकही उडाली; पण जलसंपदा विभागाने कारवाई सुरूच ठेवत सर्व उपसा पंप बंद केले. जलसंपदा विभागाची ही कारवाई सुरू असतानाच महापालिकेच्या पथकाने ताराबाई पार्क येथील जलसंपदा विभागाच्या कार्यालयात जाऊन कार्यालय सील केले. महापालिकेची जलसंपदा विभागाची 10 कोटींची घरफाळा, पाणीपट्टी आहे. त्यामुळे महापालिकेने ही कारवाई केली. कारवाई-प्रतिकारवाई असा संघर्ष दिवसभर सुरू होता.
महानगरपालिकेचा जलसंपदावर पलटवार
शहराचा पाणीपुरवठा खंडित केल्याच्या कारवाईमुळे संतप्त झालेल्या महापालिकेने जलसंपदा विभागाविरुद्ध थेट आक्रमक भूमिका घेत ‘जशास तसे’ उत्तर दिले. थकबाकीच्या मुद्द्यावरून महापालिकेच्या जम्बो पथकाने जलसंपदा विभागाचे कार्यालय सील केले. पाणीपुरवठाही खंडित केला. या धडक कारवाईमुळे दोन्ही विभागांमध्ये तणाव शिगेला पोहोचला आहे. कोल्हापूर शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी महापालिका काळम्मावाडी धरण, शिंगणापूर, नागदेववाडी आणि बालिंगा येथून पाणी उपसा करते. या बदल्यात जलसंपदा विभागाला पाणीपट्टी देणे अपेक्षित असते. मात्र, अनेक वर्षांपासून ही थकबाकी प्रलंबित आहे. दरवर्षी मार्चअखेरीस नोटीस देऊन काही रक्कम वसूल करण्याची पद्धत असताना, यंदा जलसंपदा विभागाने कठोर पाऊल उचलत थेट शहराचा पाणीपुरवठा खंडित केला.
या कारवाईने संतप्त झालेल्या महापालिकेने तत्काळ प्रत्युत्तर देत घरफाळा आणि पाणीपट्टीच्या थकबाकीसाठी जलसंपदा विभागालाच लक्ष्य केले. सुमारे 60 ते 70 अधिकार्यांच्या पथकाने कार्यालयात प्रवेश करत जलसंपदा विभागाचे कार्यालय सील केले. याचबरोबर कार्यालयाला असलेली नळजोडणी तोडून पाणीपुरवठा खंडित करण्यात आला. तर, एकेक विभाग करत संपूर्ण कार्यालयच सील केले. महापालिका आयुक्त के. मंजुलक्ष्मी यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त आयुक्त शिल्पा दरेकर, जलअभियंता हर्षजित घाटगे, करनिर्धारक व संग्राहक सुधाकर चल्लावाड, पाणीपुरवठा अधीक्षक प्रशांत पंडत यांच्यासह अधिकार्यांनी ही कारवाई केली. दरम्यान, कारवाई सुरू असतानाच स्मिता माने या नागदेववाडी येथील महापालिकेच्या पाणी उपसा केंद्रावर सील करण्याची कारवाई करत होत्या. दोन्ही बाजूंनी एकाच वेळी सुरू असलेल्या या कारवाईमुळे संघर्ष अधिक तीव— झाला.
महापालिकेच्या अधिकार्यांच्या मते, जलसंपदा विभागाकडे घरफाळा, पाणीपट्टी अशी सुमारे 10 कोटी रुपयांची थकबाकी आहे. मात्र, ही थकबाकी मान्य नसल्याचा दावा स्मिता माने यांनी केला. नोटीस न देता आणि मुदत न देता केबिन सील करण्याचा अधिकार नाही, असा आक्षेप त्यांनी नोंदविला. त्यावर महापालिकेच्या अधिकार्यांनी कारवाई सुरूच ठेवली. दोन्ही विभागांमधील या थेट संघर्षामुळे शहरातील पाणीपुरवठा व्यवस्थेवर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली असून, प्रशासनातील हा वाद आणखी चिघळण्याची चिन्हे दिसत आहेत.