

आशिष शिंदे
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात ऑक्टोबर महिन्यात तापमानात कमालीचे चढ-उतार पाहायला मिळाले. साधारणतः, या काळात पावसाळा ओसरतो आणि हिवाळ्याची चाहूल लागते; मात्र यंदा परिस्थिती उलटीच दिसली. ऐन थंडीत धो धो कोसळणार्या पावसात रात्रीचे तापमान वाढले. 15 ऑक्टोबर रोजी 24 अंश सेल्सिअस इतके उच्चांकी किमान तापमान नोंदले गेले असून, 1969 पासूनच्या नोंदीत ही पाचव्या क्रमांकाची सर्वाधिक उष्ण रात्र ठरली आहे.
हवामान शास्त्रज्ञांच्या मते, उष्ण रात्रींच्या वारंवारतेत वाढ होणे म्हणजे हवामान बदलाचे दीर्घकालीन परिणाम प्रत्यक्ष जाणवू लागल्याचे लक्षण आहे. विशेषतः, शहरांमध्ये वाढलेली काँक्रीट बांधकामे, वाहन धूर आणि झाडांची घटलेली संख्या, यामुळे ‘अर्बन हीट आयलंड इफेक्ट’ तीव— होतो, ज्यामुळे दिवसासोबतच रात्रीदेखील तापमान उच्च पातळीवर टिकून राहते.
वृद्ध, हृदयरुग्णांसाठी हे तापमान धोकादायक
उच्चांकी किमान तापमान वाढल्याने हवेत थंडाव्याचा अभाव जाणवतो, शरीराला आराम मिळत नाही आणि उष्णतेचा ताण वाढतो. दीर्घकाळ उष्ण रात्रींचा अनुभव घेतल्यास शरीरातील हार्मोनल व थर्मल संतुलन बिघडते, हृदयगती व रक्तदाब वाढतो आणि उष्णतेचा ताण (हीट स्ट्रेस) निर्माण होतो.
उच्चांकी किमान तापमान म्हणजे काय?
दिवसभरातले सर्वाधिक तापमान (कमाल) आणि रात्रीचे सर्वात कमी तापमान (किमान). किमान तापमानाचा उच्चांक म्हणजेच हायेस्ट मिनिमम टेम्परेचर. म्हणजे, रात्रीदेखील उष्णता कमी न होता तापमान जास्त राहिले तर ती स्थिती या श्रेणीत मोजली जाते.
भात, ऊस, नाचणी, टोमॅटोवरही होतो परिणाम
रात्रीचे तापमान सामान्यापेक्षा जास्त राहिल्यास शेतीवर त्याचे दूरगामी परिणाम होतात. रात्री उष्णता न कमी झाल्यास झाडांचा ऊर्जावापर वाढतो आणि त्यांच्या वाढीवर परिणाम होतो. विशेषतः, भात, ऊस, नाचणी आणि टोमॅटो यासारख्या पिकांवर हा प्रभाव स्पष्ट दिसतो.