

कोल्हापूर : कोल्हापूर महापालिका निवडणुकीसाठी प्रभाग रचनेची उत्सुकता अखेर संपली आहे. बुधवारी (दि. 3) महापालिकेकडून अधिकृतरीत्या प्रारूप प्रभाग रचनेचा नवीन नकाशा जाहीर होणार आहे. बहुसदस्य पद्धतीने प्रभाग होणार असल्याने एकेका प्रभागात 4 नगरसेवक असतील. एक प्रभाग 5 नगरसेवकांचा असेल. अशाप्रकारे यंदा कोल्हापुरात 81 नगरसेवकांसाठी 20 प्रभाग होणार आहेत. ऑनलाईन, तसेच महापालिकेतही नकाशे पाहायला मिळणार आहेत. महापालिकेच्या वेबसाईटवरही नकाशे उपलब्ध असतील.
महापालिका इमारतीत दुपारी 3 वाजता प्रशासक तथा आयुक्त के. मंजुलक्ष्मी, अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रभाग रचना जाहीर होईल. गेल्या काही महिन्यांपासून नगरसेवक, संभाव्य उमेदवार, राजकीय पक्षांत प्रभाग रचनेबाबत तर्कवितर्क सुरू होते. कोणत्या प्रभागात कोणते विभाग सामील होतील? प्रभागाचा आकार किती मोठा राहील? कोणत्या पक्षाला या नव्या रचनेचा फायदा होणार? अशा प्रश्नांची उत्तरे आज मिळणार आहेत.