Municipal and Nagar Panchayat election | आमदार-इच्छुक आमदारांतील लढतीचा रविवारी निकाल

Municipal and Nagar Panchayat election
Municipal and Nagar Panchayat election | आमदार-इच्छुक आमदारांतील लढतीचा रविवारी निकालFile photo
Published on
Updated on

कोल्हापूर : जिल्ह्यातील 13 नगरपालिका व नगरपंचायतींच्या निवडणुकीची मतमोजणी रविवारी होणार आहे. सदस्य व थेट नगराध्यक्षपदाच्या या निवडणुकीत बाजी कुणाची, यावर मोठ्या प्रमाणात पैजा लागल्या आहेत. यानंतर जनतेच्या दरबारात कौल मागण्याची संधी थेट 2029 मध्ये येणार असल्याने विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून विद्यमान आमदार व भावी आमदारांनी आपली सगळी ताकद पणाला लावली आहे.

जयसिंगपूर, कुरुंदवाड, शिरोळला यड्रावकर विरुद्ध एकत्रित विरोधक

जयसिंगपूर, कुरुंदवाड व शिरोळला स्थानिक कार्यकर्त्यांनी आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर यांना घेरले आहे. जयसिंगपूरला त्यांना रोखण्यासाठी काँग्रेस व भाजपने हातात हात घातला आहे. तर कुरुंदवाडमध्ये ठाकरे शिवसेनेने एकनाथ शिंदे यांचे समर्थक यड्रावकरांना साथ दिली असून, त्यांच्या विरोधात इतर पक्षांनी मोट बांधली आहे. शिरोळला भाजप, ठाकरे शिवसेना, शरद पवार राष्ट्रवादी व स्वाभिमानी शेतकरी संघटना एकवटल्या आहेत.

एकत्रित भाजप जनता दलाचा गडहिंग्लजला मुश्रीफांशी सामना

गडहिंग्लजमध्ये मुश्रीफ यांच्याविरोधात जनता दल, भाजप एकत्र आहेत. जनता दल, भाजपला जनसुराज्य शक्ती, शिवसेनेनेही साथ दिली आहे.

हातकणंगले निकालाकडे लक्ष

हातकणंगलेत बहुतेक सगळ्याच पक्षांच्या प्रमुखांनी आपल्या उमेदवारांना रिंगणात उतरविले आहे. भाजप, शिवसेना, राष्ट्रवादीचे उमेदवार रिंगणात असल्याने निकालाकडे लक्ष लागले आहे.

आजर्‍यात पाटील विरुद्ध महाडिक

आजरा येथे सतेज पाटील विरुद्ध धनंजय महाडिक यांच्या समर्थकात थेट संघर्ष असून महाडिक यांची ताराराणी आघाडी मैदानात उतरली आहे. तेथे हसन मुश्रीफ यांची मदत कोणाला झाली, याला महत्त्व आहे.

वडगावला प्रतिष्ठा पणाला

वडगावमध्ये सालपे व यादव या पारंपरिक गटातच लढत होत आहे. तेथे मराठा सेनेने निवडणुकीत चुरस आणली आहे. आता मतदारांनी साथ कुणाला दिली, हे रविवारी स्पष्ट होईल.

मुश्रीफ व पाटील यांची चंदगडला प्रतिष्ठा

चंदगडला भाजप-शिवसेना एकत्र लढत असून, त्यांची दोन्ही राष्ट्रवादी व काँग्रेस आघाडीशी लढत आहे. येथे हसन मुश्रीफ व आमदार शिवाजीराव पाटील यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

हुपरीत आघाडीत सामना

हुपरीत भाजप, शिवसेना, शरद पवार राष्ट्रवादी, स्वाभिमानी शेतकरी संघटना यांची अंबाबाई विकास आघाडी विरुद्ध ठाकरे शिवसेना काही अपक्ष व हिंदू महासभेच्या उमेदवारांमुळे चुरस वाढली आहे. मतदारांनी कौल कुणाच्या पारड्यात टाकला, ते रविवारी समजेल.

मुश्रीफ-घाटगे युती जनतेने स्वीकारली का? याचा निकाल

कागलमध्ये हसन मुश्रीफ व समरजित घाटगे हे कट्टर शत्रू एकत्र आल्याने कागलच्या राजकारणातल्या नेहमीच्या चुरशीला मर्यादा आल्या. यामुळे हसन मुश्रीफ व संजय मंडलिक यांच्या वाटा वेगळ्या झाल्या. तर मुरगूडमध्ये मंडलिक गटाचे राजेखान जमादार यांच्यासह मुश्रीफ यांचे विरोधक रणजितसिंह पाटील हे मुश्रीफ यांच्यासमवेत आले, तर मुश्रीफ यांचे सहकारी प्रवीणसिंह पाटील यांनी मंडलिक गटाशी जमवून घेतले आहे. आता मुश्रीफ-घाटगे यांची युती जनतेच्या पचनी पडली का? हे निकालातून स्पष्ट होईल.

पन्हाळा व मलकापूरला विनय कोरे यांची प्रतिष्ठा

पन्हाळा व मलकापूर नगरपालिकेत जनसुराज्य शक्ती पक्षाचे सर्वेसर्वा विनय कोरे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. पन्हाळा नगरपालिकेत कोरे यांच्या एकहाती वर्चस्वाला धक्का देण्यात आला. तर मलकापूरला कोरे व भाजप व राष्ट्रीय दलित महासंघाला ठाकरे शिवसेनेचे सत्यजित पाटील-सरूडकर, काँग्रेसचे रणवीर गायकवाड यांच्यासह स्वाभिमानीने उभे केलेले आव्हान कितपत टिकणार, याकडे जनतेचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news