

Kolhapur to Vishalgad ST Bus
सुभाष पाटील
विशाळगड : मागील दीड वर्षापासून विशाळगड परिसरातील नागरिक, पर्यटक आणि विशेषतः विद्यार्थ्यांसाठी डोकेदुखी ठरलेला एसटी बसच्या मुक्कामाचा प्रश्न अखेर सुटला आहे. मलकापूर आगाराची कोल्हापूर-विशाळगड-कोल्हापूर ही बस आता पुन्हा गडाच्या पायथ्याशी मुक्कामी विसावल्यामुळे गडावरील नागरिकांची मोठी गैरसोय दूर झाली आहे.
१४ जुलै २०२४ रोजी विशाळगड मुक्ती आंदोलनादरम्यान गडाच्या पायथ्याशी असलेल्या मुसलमानवाडी परिसरात हिंसाचार झाला होता. या घटनेत मोठ्या प्रमाणावर वित्तहानी झाली होती आणि परिसरात तणाव निर्माण झाल्याने दीर्घकाळ संचारबंदी लागू करण्यात आली होती. परिस्थिती निवळल्यानंतर गड खुला झाला, मात्र सुरक्षा आणि तांत्रिक कारणास्तव वनविभागाने राज्य परिवहन मंडळाच्या (एसटी) बसेसना पायथ्याशी मुक्कामी थांबण्यास मनाई केली होती.
बसचा रात्रीचा मुक्काम बंद झाल्याचा सर्वाधिक फटका शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना बसत होता. सकाळी लवकर शाळा-कॉलेज गाठण्यासाठी आणि रात्री उशिरा घरी परतण्यासाठी कोणतीही सोय नसल्याने त्यांचे शैक्षणिक नुकसान होत होते. तसेच पर्यटकांनाही खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत होता, जो आर्थिकदृष्ट्या परवडणारा नव्हता.
हा प्रश्न सोडवण्यासाठी गडावरील सामाजिक कार्यकर्ते निलेश हर्डीकर व अंजली हर्डीकर यांनी जनसुराज्य पक्षाचे युवराज काटकर (बाबा) यांच्या मार्गदर्शनाखाली एसटी प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. अखेर प्रशासनाने सकारात्मक निर्णय घेतल्याने दीड वर्षांनंतर पहिली बस मुक्कामासाठी गडावर पोहोचली. यावेळी ग्रामस्थांनी आनंदोत्सवात बसचे स्वागत केले. एसटीचे चालक आणि वाहक यांचा शाल, श्रीफळ, हार आणि पेढे भरवून सत्कार करण्यात आला.
"बस सुरू झाल्याने आमचा शिक्षणाचा मार्ग मोकळा झाला आहे. दीड वर्षे आम्हाला खूप कसरत करावी लागली, पण आता मोठा दिलासा मिळाला आहे."
— यश हर्डीकर, (विद्यार्थी, विशाळगड)