

तानाजी खोत
कोल्हापूर : यावर्षीचा दसरा वाहन उद्योगासाठी अत्यंत मोठा ठरला आहे. घटस्थापनेपासून (22 सप्टेंबर) ते दसर्यापर्यंतच्या (2 ऑक्टोबर) दहा दिवसांत कोल्हापूर शहर आणि परिसरात दुचाकी आणि चारचाकी वाहनांच्या खरेदीने मागील वर्षाचे सर्व विक्रम मोडले आहेत. घटस्थापनेपासून लागू झालेल्या जीएसटीच्या नवीन दरांमुळे झालेल्या स्वस्ताईचा फायदा घेण्यासाठी ग्राहकांनी मोठ्या प्रमाणावर बुकिंग केले.
दसर्याच्या दहा दिवसांचा विचार करता मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी दुचाकींची खरेदी दुप्पट झाली, तर चारचाकी वाहनांची खरेदी तिपटीहून अधिक वाढली. जीएसटी दरातील बदल हे या वाढीमागील प्रमुख कारण आहे. वाहन बाजारात चारचाकी गाड्यांच्या किमतींमध्ये 40 हजार ते 2 लाख रुपयांपर्यंत मॉडेलनुसार कपात झाली होती. प्रीमियम सेग्मेंटच्या काही गाड्यांच्या किमतीत तर 11 लाखांपर्यंत कपात झाली आहे. दुचाकींच्या किमतींमध्येही 4,000 ते 12,000 रुपयांची कपात झाल्यामुळे ग्राहकांनी मोठ्या प्रमाणात बुकिंग केले होते. या किमतीतील कपातीमुळे आणि दसर्याच्या शभमुहूर्तामुळे ग्राहकांनी मोठ्या उत्साहात खरेदी केली. दसर्याच्या मुहूर्तावर वाहने घरी नेण्यासाठी शहरातील शोरुम्समध्ये दिवसभर लगबग पाहायला मिळाली.