

पेठवडगाव : खासगी कंपनीतील एका जोडप्याच्या शारीरिक व मानसिक त्रासाला कंटाळून बुवाचे वठार (ता. हातकणंगले) येथील महिलेने राहत्या घरी गळफास लावून जीवन संपविले. दीपाली विनायक पाटील (वय ३३) असे मृत महिलेचे नाव असून, या प्रकरणी वडगाव पोलिसांत संबंधित जोडप्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दीपाली या संभापूर येथील एका कंपनीत कामाला जात होत्या. तेथील संशयित किरण (पूर्ण नाव समजले नाही) व त्याची पत्नी सातत्याने त्यांना शारीरिक व मानसिक त्रास देत होते. तसेच मोबाईलवरून वारंवार धमक्या दिल्या जात होत्या. या असह्य जाचाला कंटाळून सोमवारी सायंकाळी त्यांनी स्वयंपाक खोलीत ओढणीने गळफास घेत जीवन संपवले. घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक गोरख चौधर यांनी घटनास्थळी भेट दिली. ग्रामस्थांनी त्यांना उपचारासाठी रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. त्यांच्या मागे पती, मुलगा, मुलगी, सासू -सासरे असा परिवार आहे. पोलिस उपनिरीक्षक खलिक इनामदार तपास करत आहेत.